जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा- आचार्य शिरोमणी प.पू.108 आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज

जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा-आचार्य शिरोमणी प.पू.108 आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे प्रतिपादन

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज: ज्ञान हे सद‍्गुण आहे. ज्यांना ज्ञान आहे तो कधीही आक्रमक असू शकत नाही.जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा,असे प्रतिपादन आचार्य शिरोमणी श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज यांनी केले .अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केले असतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील देखील अपघात टाळण्यासाठी गुरु केला पाहिजे. गुरुशिवाय आपले जीवन पूर्ण होऊ शकत नाही. विशुद्वीने जीवनात विद्या प्राप्त करता येते, असेही यावेळी ते म्हणाले.

आचार्य विशुद्धसागरजी मुनीमहाराज यांच्यासह त्यांचे 31 शिष्य दिल्‍ली येथून कोल्हापूर येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवासाठी विहार झाले आहेत. रविवारी त्यांचे पुण्यात आगमन झाले. पुण्यातील माणिक बाग जैन मंदिरात त्यांचे स्वागत व प्रवचन झाले त्यावेळी ते बोलत होते.

सकल दिगंबर जैन समाज व विविध संस्थांच्यावतीने त्यांचे राजाराम पुलावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सकल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष मिलिंद फडे,माणिक बाग जैन मंदिराच्या सुजाता शहा,ज्येष्ठ उद्योगपती प्रकाश धारीवाल, अचल जैन,उद्योगपती अरविंद जैन, उद्योगपती जमनालाल हेपावत मुंबई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड, सुरेंद्र गांधी, जितेंद्र शहा,विनोद जैन,अजित पाटील,महावीर शहा,महावीर शहा गोखळीकर,वीरकुमार शहा यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजारामपूल ते सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदिरा पर्यंत अभिवादन फेरी काढण्यात आली होती. मिरवणूकीत बँडपथक, ढोलताशांच्या निनादसह जय जय गुरुदेवच्या घोषणांनाी परिसर दुमदमून गेला होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करुन आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनिमहाराज व त्यांच्या शिष्यांचे स्वागत करण्यात येत होते. महिला डोक्यावर कलश व हाती ध्वज घेत मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या.

माणिक बाग येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदिरांच्या प्रवेशद्वारात त्यांचे स्वागत करण्यात आले. आचार्य विशुद्ध सागर महाराज म्हणाले की, दिखाऊपणा नेहमी टाळावा. असे केल्याने आनंदाचे रूपांतर सर्वानंदात होईल. निर्भय असणे ही जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक साधना आहे. संतांपासून दूर जाऊ नका आणि दिखाऊपणाच्या जवळ जाऊ नका. ते पुढे म्हणाले, जे इंद्रियांद्वारे जाणता येत नाही, ते जीव मनाद्वारे जाणतो. जेथे इंद्रिय मनाचा प्रवेश होत नाही, तेथे जीव ज्ञानाने जाणतो. जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे, ते एका क्षणात नाहीसे होते.त्यामुळे सर्वांशी मैत्री करा, आपले जीवन घडवा, जन्म-मृत्यूच्या दु:खापासून दूर व्हा. तुमची इच्छा असेल तर क्षमता तुमच्या मनात आहे. आपल्या आहारात शुद्ध शाकाहार अन्न, शुद्ध पाणी ठेवा. आपले विचार शुद्ध ठेवा असेही यावेळी श्री आचार्य यांनी सांगितले. श्री भगवान महावीर यांचा ‘जिओ और जिने दो’या विचारसरणीच्या मार्गाने चला. पाणशेत येथील ओसाडे गावात जैन मंदिरांची प्रतिष्ठापना होणार आहे. चर्याशिरोमणी प. पू. 108 आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज व त्यांचे शिष्य यांच्या हस्ते मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे.येत्या 20 एप्रिल रोजी कोल्हापूर येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवासाठी त्यांचा विहार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *