माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२५ – अमरावती जिल्ह्यातील उबाठा पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासह उबाठाचे उपमहानगर प्रमुख व नगरसेवक सुनील राऊत, उबाठा गटाचे बडनेरा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील, उपजिल्हाप्रमुख पवन दळवी, तालुका प्रमुख राहुल लांजेवर,निलेश तिवारी, संतोष मनोहर,निलेश पारवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचा मुख्य नेता या नात्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो.

काँग्रेस काळातील घोटाळ्यांनी बेजार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २०१४ पूर्वी अकराव्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने नुकतीच चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. मोदीजींच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे कौतुकोद्गार यावेळी काढले.
२०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली, त्यापूर्वी देशात काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका सुरु होती. चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळ्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. मात्र मागील ११ वर्षांत मोदींजींवर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. याकाळात मोदीजींनी भारताला विश्वगुरु करण्याचा प्रयत्न केला, त्याचा सार्थ अभिमान असल्याचे याप्रसंगी नमूद केले. भारताने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वीपणे यान उतरण्याची किमया करुन दाखवली, आता मंगळावर जाण्याची तयारी सुरु आहे. एकीकडे विकास तर दुसरीकडे अवकाश तंत्रज्ञानातील ऐतिहासिक कामगिरी करुन भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, आमदार दिपक केसरकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ,कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेत्या कला शिंदे,शिवसेना प्रवक्ते राहूल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

