महापालिका निवडणुकांत पैशांचा आणि दबावाचा धुमाकूळ:बिनविरोध प्रक्रिया किळसवाणी – राजू शेट्टी raju Shetty यांचा घणाघात
Chhatrapati sambhajinagar:छत्रपती संभाजीनगर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ जाने २०२६ : महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला लोकशाहीचा चेहरा राहिलेला नसून पैशाची ताकद,राजकीय दबाव आणि गुंडगिरी यामुळे निवडणुका किळसवाण्या अवस्थेला पोहोचल्याची तीव्र टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांना आर्थिक आमिष दाखवून किंवा धमकावून माघार घेण्यास भाग पाडले जात असल्याने बिनविरोध निवडी सामान्य बाब नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांत प्रचंड प्रमाणात पैशांचा चुराडा झाला असून हीच परिस्थिती सध्या महापालिका निवडणुकांतही दिसून येत आहे. एका मतासाठी आठ ते दहा हजार रुपये मोजले जात आहेत तर काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवाराला माघार घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची रक्कम दिली जात असल्याचे आरोप त्यांनी केले.
बिनविरोध निवडी म्हणजे लोकशाहीचा अपमान
राजू शेट्टी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,बिनविरोध निवडी म्हणजे लोकशाहीची ताकद नसून त्या व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहेत.निवडणूक लढण्याचा अधिकारच दबावाखाली हिरावून घेतला जात असल्याने, लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.
राजकीय दबाव आणि धमक्यांचे आरोप
महापालिका निवडणुकांमध्ये भाजप,शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी जणू स्पर्धाच लागल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.या प्रक्रियेत अघोरी पद्धती वापरल्या गेल्याचे आरोप समोर आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा धमकी देणारा व्हिडिओ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा उल्लेखही राजू शेट्टी यांनी केला. या व्हिडिओत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना थेट सुरक्षेची धमकी दिल्याचे आरोप आहेत. याशिवाय मनसे आणि ठाकरे गटाकडूनही उमेदवारांवर दबाव टाकण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
निवडणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
राज्यातील ६९ पैकी ६८ जागांवर भाजप व शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी चिंता व्यक्त केली.सध्या निवडणूक निकाल पैसा आणि सत्तेच्या जोरावर ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले असून ही बाब लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक रिंगणात उतरणार
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.ज्या ठिकाणी संघटनेची मजबूत कार्यकर्ता फळी आहे, त्या ठिकाणी स्वाभिमानीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकांत बिनविरोध प्रक्रियेसाठी पैशांचा आणि दबावाचा वापर होत असल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली; निवडणूक व्यवस्था संकटात असल्याचा इशारा.






