टोकन दर्शन प्रणालीची प्रथम चाचणीचा समारंभ संपन्न – अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
वारकरी भाविकांना प्राधान्य : मंदिर समिती मार्फत आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15:- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समिती मार्फत टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणालीचा प्रथम चाचणीचा समारंभ आज करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
या टोकन दर्शन प्रणालीचा शुभारंभ सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व सदस्य महोदयांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप पंढरपूर येथे सकाळी 9.30 वाजता संपन्न झाला.
यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, भास्करगिरी बाबा,संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर,ॲड.माधवीताई निगडे,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जून भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे,पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, बलभिम पावले,संजय कोकीळ, राजाराम ढगे,शंकर मदने, राजेंद्र घागरे उपस्थित होते.

गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले,मंदिर समिती वारकरी भाविकांना केंद्र बिंदू मानून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे.वारकरी भाविकांना सुलभ व जलद दर्शन होईल यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे.या चाचणीमध्ये काही त्रुटी व नव्याने काही सुविधा निर्माण करण्याची गरज भासल्यास, त्याची पूर्तता करण्यात येईल.याशिवाय मुळ दर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी विलंब होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे. टोकन दर्शनासाठी सद्या ऑनलाईन पध्दतीने बुकींग उपलब्ध आहे परंतु कालांतराने ऑफलाईन पध्दतीने देखील बुकींग सुविधा उपलब्ध होणार आहे.तथापि टोकन दर्शन प्रणालीसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच दर्शन हॉल व स्कायवॉक लवकरच शासनाच्या माध्यमांतून निर्माण होणार आहे. त्याबाबत मंदिर समितीचा पाठपुरावा सुरू असल्याचेही हभप औसेकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले,टोकन दर्शन प्रणालीसाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांनी मोफत संगणक प्रणाली विकसित करून दिली आहे.दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींचे योग्य व्यवस्थापनावर काम करणे आवश्यक असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. टोकन दर्शन प्रणालीची बुकींगची सुविधा मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर असून, त्यासाठी सकाळी 10.00 ते रात्री 8.00 च्या दरम्यान 6 स्लॉट निश्चित करून प्रती स्लॉटमध्ये 200 प्रमाणे एकूण 1200 भाविकांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत पुरेशा प्रमाणात तज्ञ कर्मचारी वर्ग नियुक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.
आज टोकन दर्शन प्रणालीच्या शुभारंभा दरम्यान टोकन घेऊन आलेल्या वारकरी भाविकांचे मंदिर समितीच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला व पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या जयघोषात भाविकांनी दर्शनरांगेत प्रवेश केला.


