बच्चूभाऊ कडू यांच्यावतीने शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी २४ जुलै रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन


बच्चूभाऊ कडू यांच्या चक्का जाम आंदोलनास खासदार प्रणिती शिंदे यांचा जाहीर पाठिंबा

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२५- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांच्यावतीने २४ जुलै २०२५ रोजी आयोजित चक्का जाम आंदोलनास पत्राद्वारे जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्राद्वारे पाठिंबा व्यक्त करताना म्हटले आहे की, बच्चूभाऊ कडू जी आपण महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व वंचित घटकांच्या मूलभूत मागण्यांसाठी जे आंदोलन सुरु केले आहे त्यास मी पूर्णपणे जाहीर पाठिंबा देत आहे.शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग व विधवांना मासिक रु.6,000 अनुदान,शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या पलीकडे 20% प्रोत्साहन रक्कम (MSP+20%),रोजगार,शिक्षण व आरोग्य यासारख्या मूलभूत मुद्द्यावर केंद्र व राज्य शासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळेच हे जन आंदोलन अपरिहार्य झाले आहे.

आपण सुरु करत असलेले हे आंदोलन लोकशाही मार्गान जनसामान्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचाच संघर्ष आहे. गुरुकुंज मोजरी येथून सुरु झालेला हा लढा आता संपूर्ण राज्यातील लोकांच्या भावना व हक्कांचे प्रतीक ठरतो आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरु असलेल्या चक्का जाम आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देत आहे आणि केंद्र व राज्य सरकारने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी माझी आग्रही मागणी आहे.या आंदोलनातील मागण्या केवळ राजकीय नसून त्या सामाजिक न्यायाची निगडीत आहेत.या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केले तर हा असंतोष व्यापक प्रमाणावर उफळवून येईल आणि त्यास शासनच जबाबदार असेल.आपल्या संघर्षास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा असे म्हणत खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

