वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र अंगिकारून शिवसेनेची वाटचाल सुरू


गेल्या अडीच वर्षात शासनाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


वर्धा |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२५ – वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र अंगिकारून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. विदर्भा तील रामटेक लोकसभा मतदारसंघात जनतेने शिवसेनेचा खासदार निवडून संसदेत पाठवत शिवसेनेला साथ दिली. अमरावती, यवतमाळ हेदेखील शिवसेनेचे गड असून वर्ध्याच्या मातीत सुद्धा शिवसेना रुजवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन आज शिवसेना वर्धा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व शिवसैनिक आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी संवादही साधला. गेल्या अडीच वर्षात शासनाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेद्वारे सहा हजार रुपये दिले, एक रुपयात पीक विमा दिला, वारंवार होणाऱ्या नुकसानीचे पैसे दिले, एनडीआरएफच्या नाॅर्मच्या दुप्पट पैसे दिले, लेक लाडकी लखपती योजना केली, मुलींना उच्चशिक्षण मोफत केले. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

शिवसेनेचे कार्यालय हे लोकांसाठी आशेचे स्थान असते. शाखेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपला प्रश्न इथे सुटेल याची खात्री वाटायला हवी. तसे काम इथे बसणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांच्या हातून घडायला हवे. गरीब, शोषित, वंचित, पीडित घटकांना इथे न्याय मिळायला हवा असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच या कार्यालयातून शिवसेनेचे काम घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षादेखील याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार नरेंद्र भोंडेकर, शिवसेना पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


