पडत्या पावसातही कलावंताकडून रांगोळी सादर
न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धा

कोल्हापूर (जिमाका) दि 30 : कोल्हापूर शहराची सर्वात श्रीमंत गल्ली म्हणून गुजरीची ओळख.या गल्लीत नगर प्रदक्षिणा मार्गावर आज न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते.

गुजरीच्या या गल्लीत पडत्या पावसाच्या शिडकाव्याचा मारा सहन करत रांगोळी कलावंतांचा उत्साह शिगेला पोचला होता.अमाप उत्साह आणि सहनशीलता यांचा सुरेख संगम आज उपस्थित रसिकांना आढळून आला. या रांगोळी स्पर्धेत अनेक कलावंतांनी दर्जेदार रांगोळी कलेचे दर्शन घडवले.

साधारणता 900 मीटर इतक्या अंतराची रांगोळी काढण्यात आली होती. या मार्गावर कलावंतांनी सुमारे दीड टन इतक्या रांगोळीद्वारे आपल्या नेत्रदिपक कलेचे सादरीकरण केले. यासाठी तब्बल 35 स्त्री – पुरुषांच्या टीमने आपले योगदान दिले. त्यांच्या या चैतन्यदायी उत्साहावर पाऊस पाणी फिरवू शकला नाही हेच खरे ! पडत्या पावसातही कोल्हापूरकरांनी या कलावंतांच्या कलेला मनमुराद दाद दिली. यावेळी किरण नकाते, नियाज नणंदीकर, संतोष खोगरे, दिपेश पटेल, सत्यजित सांगावकर, सागर राशिंगकर आदी उपस्थित होते.