नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
महिलांसाठी रोजगार, आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षणावर भर – डॉ. नीलम गोऱ्हे
स्त्री आधार केंद्राच्या बैठकीत २०२६ साठी महिलांच्या संवाद कौशल्य,रोजगार, आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षणावर भर देण्याचा निर्णय –उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ डिसेंबर २०२५ : WomenEmpowerment Pune News महिलांना सामाजिक विषय हाताळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या stree adhar kendra वतीने नव्या वर्षात विशेष कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
स्त्री आधार केंद्राच्या सरत्या वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तसेच २०२६ या नव्या वर्षाचे नियोजन ठरविण्यासाठी आयोजित बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महिलांना सक्षम,आत्मविश्वासपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या सजग बनविण्यासाठी २०२६ मध्ये संवाद कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे. सामाजिकदृष्ट्या अवघड विषय कसे हाताळावेत, संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी यासंबंधी सखोल प्रशिक्षण दिले जाईल.
स्त्री आधार केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत विविध उपक्रम राबवत असून, हे उपक्रम नव्या वर्षात अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, ॲड.सुवर्णा कांबळे,अनिता शिंदे,आश्लेषा खंडागळे, रंजना कुलकर्णी, अनिता परदेशी,प्रज्वला ओव्हाळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सरत्या वर्षातील प्रशिक्षण कार्यक्रम,पोस्टर प्रदर्शन, केसवर्क, ऑनलाइन बैठका तसेच मुंबई–पुणे मेळावे यांना महिलांनी विशेष पसंती दर्शवली.
२०२६ मध्ये पोलीस प्रशिक्षण, महिलांशी संवाद कौशल्य, रोजगार संधी,स्त्री आरोग्य,विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदेविषयक प्रशिक्षण या विषयांवर विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीदरम्यान महिलांना दोन गटांत विभागून चर्चा घडवून आणण्यात आली. बाह्य सौंदर्य या विषयावर आंतरिक सौंदर्य, सकारात्मक विचारसरणी, सुसंस्कृत आचार-विचार व सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तर काम करताना होणारा विरोध या विषयावर चर्चा करताना दैनंदिन जबाबदाऱ्या, वेळेची अडचण आणि विनाकारण त्रास देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले की, ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११.३० वाजता त्यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारस बाग, पुणे येथे दुपारी १२.१५ ते १.३० या वेळेत ‘महिला प्रशिक्षणाची गरज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्त्री आधार केंद्राच्या या उपक्रमांमुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात अधिक सक्षमपणे आणि आत्मविश्वासाने पुढे येण्यासाठी निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

