आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन राष्ट्रगीत-राष्ट्रीय गीत वाजवावे; ९ ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य संग्राम सप्ताह साजरा करण्याची सादिक खाटीक यांची मागणी
राष्ट्रगीत-वंदे मातरमने दिवसाची सुरुवात व्हावी : सादिक खाटीक
आटपाडीत देशात पहिली नवी राष्ट्रभक्तीची प्रथा सुरू करण्याचे आवाहन : ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य संग्राम सप्ताह साजरा करण्याची अपेक्षा
आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत वाजवावे तसेच ९ ते १५ ऑगस्ट ‘स्वातंत्र्य संग्राम सप्ताह’ साजरा करून देशात नवा आदर्श निर्माण करावा, अशी मागणी सादिक खाटीक यांनी केली आहे.
atpadi-nagarpanchayat-rashtragit-vande-mataram-swatantrya-sangram-saptah
आटपाडी | ज्ञानप्रवाह न्यूज | दि.३: AtpadiNews –जन गण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन सकाळी विशिष्ट वेळेत वाजवून दिवसाची सुरुवात करावी, तसेच ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हा कालावधी स्वातंत्र्य संग्राम सप्ताह म्हणून साजरा करून देशात नवा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे.
आटपाडी नगरपंचायत मुख्यालयावर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून दररोज सकाळी प्रथम राष्ट्रगीत आणि त्यानंतर काही सेकंदांच्या अंतराने राष्ट्रीय गीत वाजविण्याची नवी प्रथा सुरू केल्यास ती देशात पहिलीच ठरेल,असा विश्वास खाटीक यांनी व्यक्त केला.नवनिर्वाचित नगराध्यक्ष,सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी हा उपक्रम सुरू करून राष्ट्रप्रेमाचा नवा इतिहास घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
दररोज राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत वाजविल्याने १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचा राष्ट्रोत्सव प्रतिदिनी साजरा होत असल्याची अनुभूती नागरिकांना येईल व प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले. औंध संस्थानचा भाग असलेल्या आटपाडी तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावली असून अनेक स्वातंत्र्यसैनिकांना येथे आश्रय देण्यात आला होता, असा गौरवशाली इतिहासही त्यांनी अधोरेखित केला.
९ ऑगस्ट १९४२ च्या क्रांती दिन आणि १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य दिना दरम्यानचा सात दिवसांचा कालावधी स्वातंत्र्य संग्राम सप्ताह म्हणून साजरा करून स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग,बलिदान व संघर्षाचा जागर केला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या सप्ताहात शहरातील विविध ठिकाणी शहीद स्मारके,स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, संविधानाचा जागर,प्रभातफेऱ्या व देशभक्तीपर उपक्रम राबवावेत, असेही खाटीक यांनी सुचविले.
हा सप्ताह सर्वसमावेशक, लोकशाही समृद्ध करणारा आणि सबका सप्ताह ठरावा, जेणेकरून राज्य व देशाचे लक्ष आटपाडीच्या या उपक्रमाकडे वेधले जाईल,असे मत सादिक खाटीक यांनी व्यक्त केले.
