बारामतीच्या कटफळ येथे 75.13कोटींचे जिल्हा क्रीडा संकुल;मंत्रिमंडळाची मंजुरी, अजित पवारांचे स्वप्न होणार साकार

बारामतीच्या कटफळ येथे 75.13 कोटींचे जिल्हा क्रीडा संकुल;मंत्रिमंडळाची मंजुरी,अजित पवारांचे स्वप्न होणार साकार

बारामती तालुक्यातील कटफळ येथे 75.13 कोटी रुपयांच्या जिल्हा क्रीडा संकुलाला मंत्रिमंडळाची मंजुरी. पॅव्हेलियन, जलतरण तलाव,स्केटिंग रिंक, आर्चरी रेंजसह आधुनिक सुविधा उभारल्या जाणार.

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० : बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल (टप्पा-३) उभारणीस मंत्रिमंडळाने कार्योत्तर मान्यता दिल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी ₹75.13 कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्या नंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय मार्गी लावण्यात आला. त्यामुळे अजित पवार यांनी जिल्हास्तरावर दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला पुढील दिशा मिळाली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राप्त ८० हजार चौरस मीटर क्षेत्रावर हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जाणार आहे.या संकुलात पॅव्हेलियन,जलतरण तलाव, स्केटिंग रिंक,आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान यांसह विविध आधुनिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

बारामती येथे यापूर्वी टप्पा-१ व टप्पा-२ अंतर्गत क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत.आता टप्पा-३ मुळे संकुलाचा विस्तार अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात होणार आहे.

उच्चस्तरीय सचिव समितीने प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी दिली.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून, आधुनिक वास्तुशास्त्रीय निकषांनुसार संकुलाची उभारणी केली जाणार आहे.

या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असून बारामती तालुका क्रीडा क्षेत्रात नवे आदर्श प्रस्थापित करेल,असा विश्वास व्यक्त होत आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला हीच खरी आदरांजली मानली जात आहे.

Leave a Reply

Back To Top