पंढरपूरच्या टीम डेविल्सने सन्मती चषकावर नाव कोरले;अकलूज येथे रंगली भव्य डे-नाईट टर्फ क्रिकेट स्पर्धा
जैन समाजातील युवकांना एकत्र आणणारी क्रिकेटची मेजवानी; टीम डेविल्स विजेता,टीम क्लाशेर्स उपविजेता
अकलूज | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१ जून २०२६:श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्थेच्या वतीने आयोजित भव्य डे-नाईट टर्फ क्रिकेट स्पर्धा रविवार दि. 31 मे 2026 रोजी अकलूज येथील श्रीराम स्पोर्ट्स अरेना, माळेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील 12 संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंढरपूरच्या टीम डेविल्स आणि टीम क्लाशेर्स यांच्यात रोमांचक लढत रंगली. आठ-आठ षटकांच्या या सामन्यात टीम डेविल्सने उत्कृष्ट कामगिरी करत 19 धावांनी विजय मिळवला आणि प्रतिष्ठेचा सन्मती चषक आपल्या नावावर केला तर टीम क्लाशेर्सने उपविजेतेपद पटकावले. उत्कृष्ट संघाचा पुरस्कार श्री लक्ष्मीसेन स्वामीजी सुपर किंग्स अकलूज या संघाला प्रदान करण्यात आला.
या स्पर्धेचे सहप्रायोजकत्व डॉ. सतीश दोशी यांनी स्वीकारले होते. स्पर्धेचा शुभारंभ श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष व भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिहीर गांधी,विद्यमान अध्यक्ष तेजस गांधी तसेच सेवा दलाचे माजी अध्यक्ष,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन व नाणेफेक करून करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांनी सांगितले की,जैन समाजातील युवकांमध्ये मैत्री,आपुलकी,समाजबंध आणि खिलाडू वृत्ती विकसित व्हावी तसेच त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळावे हा स्पर्धा आयोजनामागील मुख्य उद्देश होता. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत रमणाऱ्या तरुणांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून डिजिटल पॉज घ्यावा हा देखील या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेतील सर्व सामने थेट प्रक्षेपित करण्यात आले होते.अनुभवी समालोचकांच्या प्रभावी निवेदनामुळे प्रत्येक सामन्यात उत्सुकता वाढली. सहभागी खेळाडू व उपस्थित बांधवांसाठी दिवसभर चहा,पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धेचे आकर्षक व अभ्यासपूर्ण समालोचन अनंत कुलकर्णी आणि संदीप पिसे यांनी केले. या सर्व सामन्यांमध्ये निष्पक्ष आणि दर्जेदार पंच म्हणून ज्ञानेश शिंदे आणि अनिल रेवंडे यांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स अकलूज, बावडा वॉरियर्स,श्री लक्ष्मीसेन स्वामीजी सुपर किंग्स, कुंथुनाथ ग्रुप, टीम फ्रेंड्स अकलूज, टीम ब्लेझिंग लॉयन्स नातेपुते,श्री जिनसेन स्वामीजी स्ट्रायकर्स, टीम डेविल्स पंढरपूर,णमोकार वॉरियर्स, अकलूज टायटन्स आणि टीम क्लाशेर्स पंढरपूर या संघांनी सहभाग नोंदवला होता.
युवा वर्गाला एकत्र आणणाऱ्या आणि समाजातील क्रीडा संस्कृतीला चालना देणाऱ्या या स्पर्धेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

