दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी

गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावल्यावरून सनातनच्या साधकाचा पोलिसांकडून बेकायदेशीर डांबून छळ ?

दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१.०९.२०२५ – गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवडी परिसरात आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा अशा आशयाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावणाऱ्या संदीप हरिश्चंद्र शिंगाडे या सनातनच्या साधकाला किडवाई मार्ग पोलिसांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय ताब्यात घेऊन दीड तास त्यांचा छळ केला.पोलिसांच्या या मनमानी दडपशाहीचा आम्ही सनातन संस्थेच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करतो.या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली.

२६ ऑगस्ट २०२५ या दिवशी रात्री ७:३० वाजता आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा या विषयाचे भित्तिपत्रक लावत असतांना कोळेकर,कांबळी आणि रामसिंग या नावाच्या पोलिसांनी सनातनचे साधक श्री. शिंगाडे यांना कोणतेही वॉरंट किंवा कारण न देता जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेणे;रात्री ९ वाजेपर्यंत घाडगे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने चौकशीच्या नावाखाली त्यांच्या मानसिक छळ करणे;चौकशी दरम्यान धमक्या देणे;वैयक्तिक मोबाईल काढून त्यातील वैयक्तिक माहिती घेणे;त्यांच्या फोनमधील कॉल लॉग्स व वैयक्तिक कागदपत्रांचे फोटो काढणे;साधकाला त्यांच्या वकिलाशी वा कुटुंबियांशी संपर्क साधू न देणे; तसेच रात्री ९ वाजता त्यांना कोणताही कागदोपत्री पुरावा न देता सोडून देणे ही संपूर्ण कारवाई भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम ३५ चे सरळ उल्लंघन करणारी आहे.तसेच हा पोलिसांनी केलेल्या अधिकारांच्या दुरुपयोगाचा गंभीर नमुना आहे, असे श्री.वर्तक यांनी म्हटले आहे.

अभय वर्तक पुढे म्हणाले की,गणेशोत्सवाच्या काळात गणेशपूजनाचे शास्त्र,गणेशाची कृपा कशी संपादावी, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी प्रबोधन करणे गुन्हा आहे का ? हा भारतीय संविधानाने दिलेल्या हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर पोलीस प्रशासनाने घातलेला घाला आहे.कधी पोलिसांनी मुसलमान अथवा ख्रिश्चन धर्मियांना त्यांच्या धार्मिक कृतीविषयी माहिती सांगतांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन छळ करण्याचे धाडस केले आहे का ? याचे उत्तर किडवई मार्ग पोलिसांनी जनतेला द्यावे.हिंदू सणांच्यावेळी हिंदूंची ही मुस्कटदाबी आम्ही कदापी सहन करणार नाही.जर दोषी अधिकाऱ्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी तात्काळ कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्ही या विरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करू तसेच दोषींना शिक्षा होईपर्यंत सनातन संस्था या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे,असेही श्री.वर्तक यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Back To Top