चोखोबा ते तुकोबा – एक वारी समते चे रविवारी प्रस्थान; मंगळवेढ्यात भव्य अभिवादन सभा
संत रविदास महाराज जयंतीनिमित्त चोखोबा ते तुकोबा – एक वारी समते ची या समता वारीचे रविवारी मंगळवेढ्यात प्रस्थान होत असून समता, मानवता व बंधुतेचा जागर करणारी भव्य अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.
Pune news: पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज : संत शिरोमणी रविदास महाराज जयंती आणि चोखोबा ते तुकोबा एक वारी समते या समता वारीच्या प्रस्थान सोहळ्या निमित्त रविवारी मंगळवेढा येथे भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजात समता,मानवता आणि बंधुतेचा विचार अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ही सभा आयोजित करण्यात आली असून समता वारीचे संस्थापक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या वतीने देण्यात आली.

संत रविदास महाराज यांनी आपल्या समतावादी विचारांतून जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्याया विरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवला. श्रमाला प्रतिष्ठा,माणसाला माणूसपण आणि मानवतेला धर्म मानणारा त्यांचा विचार आजच्या सामाजिक वास्तवात अधिकच मार्गदर्शक ठरत आहे.याच समतेच्या विचारपरंपरेतून साकार झालेली चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची ही वारी केवळ पदयात्रा नसून सामाजिक न्याय,लोकशाही मूल्ये आणि बंधुतेचा संदेश देणारी व्यापक सामाजिक चळवळ बनली आहे.
या अभिवादन सभेत संत रविदास महाराजांचे जीवनकार्य तसेच संत चोखामेळा,संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या समता व मानवतेच्या विचारांचा सखोल ऊहापोह करण्यात येणार आहे. समता वारीची संकल्पना, तिची सामाजिक भूमिका आणि भावी दिशा यावर मार्गदर्शन होणार असून, विशेषतः तरुण पिढीने या समता चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
१७५० किलोमीटरचा सामाजिक प्रबोधनाचा प्रवास
एक वारी समतेची ही वारी महाराष्ट्रातील सोलापूर,धाराशिव, लातूर,बीड,छत्रपती संभाजीनगर,जालना,अहिल्यानगर आणि पुणे,बुलढाणा अशा ९ जिल्ह्यांतून सुमारे १७५० किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
या प्रवासादरम्यान विषमता, जातीयवाद, सामाजिक दरी, नक्षलवाद व दहशतवाद यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर सकारात्मक प्रबोधन करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वाड्या-वस्त्या, गावे आणि शहरे येथे जाऊन जातीय व धार्मिक विद्वेष कमी करून परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करणे, हाच या समता वारीचा मुख्य उद्देश आहे.

