मुंबई फाइल्स – ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत

मुंबई फाइल्स – ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई,महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

Mumbai news : ज्ञानप्रवाह न्यूज – २६ जानेवारी २०२६ या प्रजासत्ताकदिनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरील मेट्रो स्टेशनवरून जाताना मला काळ कसा झरझर बदलतो आहे, याची जाणीव झाली. ‘कहीं बिल्डिंग कहीं ट्रामें, कहीं मोटर, कही मिल’ हे सीआयडी चित्रपटातील गाणे बरोबर ७० वर्षांपूर्वीचे. ते लिहिलेले आहे मजरूहने. मिलता है यहाँ सबकुछ, एक मिलता नहीं दिल, इन्साँ का नहीं यहाँ नामोनिशाँ’… भेदक भाष्य.

आजही मुंबईत लोकलमधील किरकोळ वादावरून एका प्राध्यापकाची भोसकून हत्या होते आणि आरोपी बिनधास्तपणे पळून जातो हे कशाचे लक्षण आहे ? मुंबईतील पहिली उपनगरीय लोकल सेवा १२ एप्रिल १८६७ रोजी सुरू झाली.ही सेवा बॉम्बे बडोदा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे कंपनीने तत्कालीन बॅकबे म्हणजेच (मरीन लाइन्स आणि चर्चगेट दरम्यान) ते विरार अशी सुरू केली होती. भारतात पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली.

‘ए दिल है मुश्किल’ या गाण्यात ज्या ट्रामचा उल्लेख केला आहे, ती मी अगदी लहान असताना पाहिली आहे आणि त्यात बसलोही आहे.रस्त्याच्या मधूनच ती धावायची. १८७४ मध्ये मुंबईत ट्राम गाड्यांची वाहतूक मोठ्या रस्त्यांवरच नव्हे, तर गल्लीबोळातून देखील सुरू झाली होती. ही गाडी गरिबांचे वाहन मानली जात होती.गाडीच्या धावण्याचा पल्ला कितीही मोठा असला तरी अर्ध्या- दोन आण्यांत प्रवाशांचे काम भागत असे. सुरुवातीच्या काळात ट्रेन हे वाहन ओढण्यासाठी घोडे जुंपावे लागत. हा ट्रेन गाडी आणि आगगाडी यात फरक होता. या गाड्यांच्या प्रवासाची वेळ सकाळी साडेपाच ते रात्री साडेअकरापर्यंतची ठेवलेली होती. प्रारंभी एक घोड्याची व मागून दोन घोड्यांच्या ट्रेन अस्तित्वात आल्या.उतारूंच्या बाजू उघड्या असत. नंतर त्या बंद केल्या गेल्या.घोड्यांच्या ट्रेन गाड्या १९०७ पर्यंत सुरू होत्या. त्यासाठी जवळजवळ ९०० घोडे दोन तबेल्यांत विभागून ठेवलेले असत.एक तबेला जिजामाता उद्यान किंवा राणीबागेसमोर भायखळा भागात होता तर दुसरा तबेला कुलाब्यात. तेथेच कंपनीच्या कारभाराचे केंद्र होते. ट्राम गाड्यांना जन्म देणाऱ्या कंपनीला सुरुवातीला भांडवल मिळवणे कठीण गेले.त्यामुळे तिने अमेरिकेतून भांडवल उभारले.

१९०७ च्या मे महिन्यात विजेवरच्या ट्रेन गाड्या चालू करण्यात आल्या. घोड्यां ऐवजी एक दांडी गाडीच्या छपरास लावलेली असून, ती वरील विजेच्या तारेस जोडलेली असे. तिच्याद्वारे गाडीला वीज पुरवठा होत असे. विजेच्या ट्रेन गाड्या कुठे थांबाव्यात, यासाठी विशिष्ट जागा होत्या आणि तेथे तशा पाट्या लावलेल्या असत. घोड्यांच्या ट्रेन गाड्यांना अशी सोय नसल्यामुळे उतारूंनी हात करून, आपल्या मर्जीप्रमाणे ट्रेन थांबवावी,असा प्रकार पूर्वी होता!

हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आशीर्वाद या चित्रपटात अशोककुमारने रेल गाडी हे गाणे म्हटले आहे. हे गाणे हरींद्रनाथ चटोपाध्याय यांनी लिहिले होते.वसंत देसाईंनी त्याला संगीत दिले होते.एक प्रकारे ते रॅपगीतच होते.या गाण्यात रेल्वेचे आवाज काढण्यात आले आहेत,परंतु या गाण्याच्या चित्रणात कुठेही रेल्वेगाडी नाही. आओ बच्चों खेल दिखाये, झुक झुक करती रेल चलाये, सिटी लेकर सीट पे बैठो, एक दुजे की पीठ पे बैठो’ हे शब्द होते भारी आणि मस्त! राजेश खन्नाच्या द ट्रेन या चित्रपटात रेल्वेमधील चोर्‍या आणि खून अशी कथा आहे. त्यामध्ये इगतपुरी स्टेशन आणि नाशिकच्या जवळपासच्या रस्त्यांवरचे शूटिंग आहे.

‘तनू वेड्स मनू’ मध्ये ‘मन्नू भैया क्या करे है’ हे रेल्वेमधील अफलातून गाणे आहे. लोकगीताच्या ढंगातील या गाण्याचे लेखन,संगीत आणि त्याचे रेल्वेमधील चित्रण जबरदस्त आहे.कॅमेरा डब्यातील प्रत्येक सेक्शनमधून फिरत राहतो..

बातों बातों में या चित्रपटात अमोल पालेकर आणि टीना मुनीम आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील घटनांचा प्रवासही लोकलच्या साक्षीनेच होतो.ज्ञानदा रामतीर्थकरच्या मुंबई लोकल या चित्रपटात देखील लोकलमध्ये फुलणाऱ्या प्रेमाची कथा आहे.

धोबीघाट,द लंच बॉक्स,स्लमडॉग मिल्यनेअर,वास्तव यासारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये लोकल ट्रेनचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. देवानंदला ट्रेन पकडण्यासाठी धावत असताना चर्चगेट येथे दिग्दर्शक शाहीद लतीफ यांचा फोन आला आणि त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी बॉम्बे टॉकीजमध्ये भेटायला बोलावले होते.देवच्या कारकिर्दीतील ‘जिद्दी’ हा महत्त्वाचा चित्रपट त्याला या फोनद्वारेच मिळाला!

मुंबई शहराचे प्रतिबिंब म्हणून लाइफ इन अ मेट्रो, मुंबई मेरी जान, वेकअप सीड, गल्ली बॉय अशा अनेक चित्रपटांत लोकल हीच एक कॅरेक्टर बनून येते. तीन-चार वर्षांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दिकी हा ट्रॅफिक टाळण्यासाठी आणि एका कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करताना दिसला होता.परंतु शत्रुघ्न सिन्हा,असरानी, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार अशा अनेकांनी आपल्या उमेदीच्या काळात लोकलनेच प्रवास केला आहे.

पन्नास वर्षांपूर्वी पुणे स्टेशनवर राज कपूर डेक्कन क्वीनने मुंबईला जाण्यासाठी आला होता तेव्हा त्याच्याशी मी पाचेक मिनिटे बोललो होतो.इतका मोठा नट देखील त्यावेळी ट्रेनने प्रवास करत होता. त्याच्याबरोबर अन्य कोणीही सहाय्यक नव्हता. ४० वर्षांपूर्वी शबाना आझमी लोकल ट्रेनने सीएसटी स्टेशनला चालली होती.त्या प्रवासात तिच्याशी मी संवाद साधला होता.

लता मंगेशकर जेव्हा कोल्हापूरहून मुंबईला आल्या, तेव्हा अत्यंत लहान वयात त्या ट्रेनने मालाडला जात होत्या.तेथे बॉम्बे टाॅकीजच्या स्टुडिओत त्या गाण्यासाठी जायच्या.त्या काळात ट्रेनला गर्दी नसे आणि लोकलने प्रवास करणाऱ्या मुली खूप कमी होत्या.आपल्या कुटुंबासाठी लताबाईंनी जी मेहनत घेतली, त्याला तोड नाही.

27 डाऊन या चित्रपटात ट्रेन बोरीबंदरला येते.नंतर त्यामधून दोन्ही बाजूने लोक उतरतात आणि संपूर्ण स्टेशन माणसांच्या थव्याने फुलून जाते हा अत्यंत प्रभावी शॉट पाहिल्याचे मला आठवते.

मुंबईला येऊन मला ४८ वर्षे झाली.या अफाट गर्दीत मीही सामील झालो.कधी ट्राममध्ये बसलो तर कधी लोकलमध्ये. कधी मेट्रोमध्ये तर कधी ॲक्वा लाइन मध्ये. धर्मेंद्रच्या ‘दोस्त’ या चित्रपटात ‘गाडी बुला रही है, सिटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है’ अशा ओळी आहेत.

शेवटी सारे प्रवासी घडीचे…!

Leave a Reply

Back To Top