संत परंपरेवर वक्तव्य वाद;पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तीव्र निषेध,दिलगिरीची मागणी

संत परंपरेवर वक्तव्य वाद;पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तीव्र निषेध,दिलगिरीची मागणी

Pandharpur news:पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती Shri Vitthal Rukmini Mandir Samiti च्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.

दि.२२ मार्च २०२६ रोजी पुणे येथे आयोजित महाराष्ट्र नास्तिक मेळावा २०२६ या कार्यक्रमात करण्यात आलेल्या काही वक्तव्यांमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने समाजातील श्रद्धा आणि संत परंपरेचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,वारकरी संप्रदाय हा शेकडो वर्षांपासून समाजात समता, प्रेम, शांतता आणि आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देत आला आहे. संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar, संत तुकाराम Sant Tukaram,संत नामदेव Sant Namdev,संत एकनाथ Sant Eknath यांच्या कार्यामुळे समाजात बंधुभाव आणि नैतिक मूल्यांची जपणूक झाली आहे.

मंदिर समितीच्यावतीने असेही सांगण्यात आले की,अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात गैरसमज,तणाव व असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करून वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेबाबत आदराची भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी त्याचा वापर करताना समाजातील विविध धर्म,परंपरा आणि श्रद्धांचा आदर राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर मंदिर समितीचे सह- अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर Gohininath Maharaj Asekar यांची स्वाक्षरी असून समितीतील सदस्य म्हणून आ.रामचंद्र कदम,शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम,भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे,ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख, ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच सदस्या व पंढरपूर च्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आदींची नावे नमूद करण्यात आली आहेत.

समाजात सलोखा,शांतता आणि परस्पर आदर कायम ठेवण्यासाठी सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Back To Top