सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांची जिरवण्यासाठी जोमात,गांव मात्र कोमात
करकंब ग्रामस्थांचे होत आहेत अतोनात हाल
करकंब ,मनोज पवार - पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव म्हणून करकंबची ओळख. 25 ते 30 हजार लोकसंख्येचे गाव.गावाला कोट्यावधी रुपयाचा निधी येतो परंतु नियोजन शून्य कारभारामुळे करकंबकरांचे हाल होत आहेत याकडे मात्र कारभार्यांचे अजिबात लक्ष नाही.
गेली कित्येक वर्षे झाले गावातील स्मशान भूमीतील पाण्याचा हौदाचा प्रश्न,गावातील विजेचा प्रश्न, स्वच्छतेच्या बाबतीतील प्रश्न अद्याप कोणालाही सोडवता आलेला नाही.गावातील पुढारी म्हणून मिरवत असलेल्या नेते मंडळींनाही सोडवता आलेला नाही हे गावाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
निवडणूक कालावधीत तेवढ्यापुरतीच आश्वासन दिले जातात व इलेक्शनमध्ये गावातील मतदारांना लाखो रुपये खाण्यापिण्यावर खर्च करतात पण गावातील मूलभूत सुविधांबाबत अजिबात कुणालाही याचे काही देणेघेणे नाही.
करकंबच्या एसटी स्टँड ते नेमतवाडी रस्त्यालगत शाळा, माळी गल्ली,शुक्रवार पेठ आहे येथील लोकांना जीव मुठीत धरून जावे लागते तसेच जळोली चौक ते धाकटी वेस या दरम्यान मोठा ओढा आहे कित्येक वर्षे झाली नागरिकांची येथे पुल बांधण्याची मागणी आहे परंतु याकडे नेते मंडळींचे पूर्ण दुर्लक्ष आहे . या ओढ्यामधून वाड्या वस्तीवरील शाळेतील मुलांना, पालकांना, वयोवृद्धांना जीवावर उदार होऊन जावे लागते पावसाळ्यामध्ये नागरिकांना चिखल तुडवत जावे लागते. सत्ताधारी व विरोधक हे मात्र नुसते मिजाशीत फिरताना दिसत आहेत.निवडणूकांसाठी लाखो रुपये खर्च करू शकतात मग गाव विकासासाठी खर्च का करू शकत नाहीत असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
एकंदरीतच करकंबमध्ये सध्या सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांची जिरवण्यासाठी जोमात आहेत पण गांव मात्र कोमात आहे हे मात्र निश्चित