Nawab Malik: समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; ‘त्या’ दाव्यावर ठाम


हायलाइट्स:

  • समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान.
  • वानखेडे यांच्या बहिणीच्या वक्तव्याकडे दाखवले बोट.
  • दुबईवारीबाबत केलेल्या दाव्यावर मलिक ठाम.

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे सर्व आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. आपण मालदीवला रितसर परवानगी घेऊन गेलो होतो मात्र दुबईला गेलो नव्हतो, असे वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. एनसीबीनेही वानखेडे मालदीवला गेले होते, असे म्हटले आहे. नेमके त्यावरच बोट ठेवत मंत्री मलिक यांनी नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ( Sameer Wankhede Vs Nawab Malik Latest News )

वाचा: ‘समीर वानखेडेंची नोकरी घालवणार, त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय थांबणार नाही’

‘मंत्री मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. माझी बहीण यास्मिन वानखेडे हिच्यासोबत मी कधीही दुबई किंवा मालदीवला गेलेलो नाही. सेवेत रुजू झाल्यानंतर माझा एकही दुबई प्रवास झालेला नाही. मी जो मालदिवला गेलो होतो तो माझ्या खर्चाने गेलो होतो. त्यासाठी मी रितसर सुट्टी घेतली होती’, असे नमूद करत समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे आरोप फेटाळले. माझ्यावर, माझ्या दिवंगत आईवर, निवृत्त सैनिक असलेल्या माझ्या वडिलांवर, माझ्या बहिणीवर मलिक गेले १५ दिवस खोटे आरोप करत आहेत. त्यांना मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे, असेही वानखेडे यांनी सांगितले. त्यानंतर मलिक यांनी लगेचच माध्यमांकडे प्रतिक्रिया देत वानखेडे यांना आव्हान दिले आहे.

वाचा: समीर वानखेडे यांचा नवाब मलिकांवर पलटवार; सर्व आरोप फेटाळले!

‘समीर वानखेडे हे दुबईला गेल्याचा इन्कार करत आहेत. एनसीबीच्या प्रेस नोटमध्येही वानखेडे रितसर रजा घेऊन मालदीवला गेले होते मात्र दुबईला जाण्यासाठी त्यांनी कोणताही अर्ज केलेला नव्हता, असे म्हटले आहे. असे असताना खुद्द वानखेडे यांची बहीण मात्र ते मालदीवला आले नव्हते असे म्हणते आहे. हा विरोधाभास नाही का?’, असा सवाल मलिक यांनी केला. ट्वीटरवर मी जो फोटो पोस्ट केला आहे त्यात टाइमलाइन स्पष्टपणे दिसत आहे. तो फोटो दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमधला आहे आणि १० डिसेंबर २०२० रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे, असे मलिक यांनी निदर्शनास आणून दिले. माझ्यावर कायदेशीर कारवाई करणार असे वानखेडे म्हणत आहे. त्यावर माझी हरकत असण्याचे कारण नाही. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे आणि कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा त्यांना आणि मलाही अधिकार आहे, असे मलिक म्हणाले. या सर्वच गोष्टी येत्या काळात योग्य ठिकाणी पोहचतील आणि जे काही सत्य आहे ते समोर येईल, असेही मलिक यांनी नमूद केले.

वाचा: संजय राऊतांचं थेट सोमय्यांना पत्र!; ५०० कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे दिले आणि…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: