सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर वैद्यमापन विभागाची भरारी पथकाकडून तपासणी
भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज :- पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर वैद्यमापन विभागाचे भरारी पथक आले असता,त्यांनी केलेल्या तपासणीत कारखान्याचे सर्वच वजनकाटे बरोबर असल्याचे आढळुन आले. त्यामुळे वजनात कोणताही गैरप्रकार नसल्याचे भरारी पथक व वैद्यमापन अधिकारी यांचेकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन आजतागायत पारदर्शक पध्दतीने करण्यात आलेले आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार करण्यात आलेला नाही तसेच दरवर्षी वैद्यमापन विभागाचे भरारी पथक कारखान्यावर काटा तपासणीसाठी येत असते.चालु गळीत हंगामातही दि.10 डिसेंबर 2024 रोजी वैद्यमापन पथकाने अचानक कारखान्यावर भेट देवुन कारखान्याचे 60 व 10 टनी प्रत्येकी दोन वजनकाट्यांची तपासणी करण्यासाठी वजनकाट्यावरुन वजने करुन गव्हाणीकडे गेलेल्या ट्रॅक्टर व बैलगाड्यांना परत बोलावुन फेरवजन केले. पुर्वी व दुबार वजन केलेल्या वाहनांच्या वजनामध्ये तफावत नसल्याचे आणि कारखान्याचे चारही वजनकाटे योग्य् व बिनचुक असल्याचे या पथकास निदर्शनास आल्यामुळे काटा अचुक असल्याचे शिक्का मोर्तब केले.
प्रत्येक 20 किलोच्या प्रमाणित लोखंडी 600 नगांच्या सह्याने वजनकाट्यांची पडताळणी करण्यात आली तीही बरोबर व बिनचुक असल्याचा अहवाल या भरारी पथकाने दिल्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची सहकार शिरोमणी कारखान्या वरील विश्वासर्हता कायम राहिली,अशी माहिती कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी दिली.
यावेळी भरारी वैद्यमापन पथकामध्ये उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र पुणे सतिश अभंगे,इंदापूर विभागाचे अंकुश इंगोले तसेच निरिक्षक वैद्यमापन शास्त्र पुणे टी.के.पाटील व खेड विभागाचे वैद्यमापन शास्त्र अधिकारी प्रदिप बागडे यांच्यासह शेतकरी, वाहनमालक उपस्थित होते. तसेच कारखान्याच्या काटा तपासणीवेळी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पी.डी. घोगरे, वर्क्स मॅनेजर पी.टी.तुपे, डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर कदम, शेती अधिकारी प्रतापराव थोरात, परचेस अधिकारी सी.जे.कुंभार,सर्व ॲग्री ओव्हरसिअर, केनयार्ड सुपरवायझर डी.डी.काळे, कार्यालयीन अधिक्षक ज्ञानेश्वर कुंभार, सुरक्षा अधिकारी मनसुब सय्यद, करखान्याचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

