अवैध मुरूम तस्करांचा महिला वन अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला:Illegal laterite smugglers launch a life-threatening attack on a female forest officer:
खरातवाडी वनपरिक्षेत्रातील थरारक घटना
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ जानेवारी २०२६ : पंढरपूर वनपरिक्षेत्रातील मौजे खरातवाडी (गट नं. २८०) येथे शासकीय कर्तव्य बजावत असताना अवैध मुरूम तस्करांनी महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुरूमाने भरलेला भरधाव टिपर थेट अंगावर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) श्रीमती शितल बालाजी चाटे या थोडक्यात बचावल्या.

ही घटना दि.६ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात चार आरोपीं विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध मुरूम वाहतूक उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शितल चाटे आणि वनपाल बापूराव शंकरराव भोई हे नियमित गस्तीवर असताना खरातवाडी वनक्षेत्रातून तीन टिपर अवैध गौण खनिज (मुरूम) भरून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यापैकी एका टिपरचा क्रमांक MH-16-AY-6816 असून उर्वरित दोन टिपर विना नंबर प्लेट होते.श्रीमती चाटे यांनी स्वतःची ओळख वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून करून देत वाहने थांबवली व परवान्याची मागणी केली.मात्र वाहनचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अवैध मुरूम वाहतूक स्पष्ट झाली. त्यानंतर सदर वाहने जप्त करून वन कार्यालयात नेण्याचे आदेश देण्यात आले.
अधिकाऱ्यांना धमकी,टिपर अंगावर घालण्याचा प्रयत्न
वाहने जप्त करून नेत असताना सिद्धार्थ चंद्रकांत नाईकनवरे याने बनाव करून टिपर थांबवला व अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेला एक अनोळखी इसम घटनास्थळी आला.
श्रीमती चाटे यांनी कायदेशीर समज दिल्यानंतरही आरोपींनी वाद घातला. यावेळी अनोळखी इसमाने श्रीमती चाटे यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि टिपर सुरू केला.बाजूला व्हा,नाहीतर टिपर अंगावर घालीन अशी उघड धमकी देत जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपीने मुरूमाने भरलेला टिपर थेट श्रीमती चाटे यांच्या दिशेने चालवला. प्रसंगावधान राखून त्यांनी बाजूला उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र आरोपी जप्त केलेली वाहने घेऊन पसार झाले.
यांच्यावर कारवाई :
या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शितल चाटे यांच्या फिर्यादीवरून करकंब पोलीस ठाण्यात सिद्धार्थ चंद्रकांत नाईकनवरे रा.व्होळे,ता.पंढरपूर,चंद्रकांत बाळासाहेब घोडके रा.व्होळे,ता.पंढरपूर आणि दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.
या प्रकरणी वनविभागामार्फत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना अशा हल्ल्यांना भीक घालणार नाहीत.अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहील,असा ठाम संदेश वन विभागाने दिला आहे.

