द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

अभ्यासाबरोबर खेळ व्यायाम हाही महत्त्वाचा व निरोगी जीवन जगण्याचा मूलमंत्र-विवेक परदेशी

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द. ह. कवठेकर प्रशाला ही पंढरपुरातील प्रथित यश सुवर्ण महोत्सवी प्रशाला आहे. प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि.6 फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.प्रमुख अभ्यागत म्हणून डॉ सौरभ ठवरे, डॉ सौ. उर्मिला सौरभ ठवरे, माजी नगरसेवक विवेक परदेशी व डॉ सौ.अश्विनी विवेक परदेशी हे होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर उपस्थित होते.संस्था सदस्य एस.पी. कुलकर्णी सर, संजय कुलकर्णी सर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री वगैरे सर, सहसचिवा श्रीमती शिंदे मॅडम,शालेय व्यवस्थापन समितीच्या सौ.दिपाली सतपाल व महेश तेंडुलकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करताना प्रमुख अभ्यागत डॉ सौरभ ठवरे म्हणाले की,शाळा ही तुमचे सर्व गुण पूर्णपणे विकसित करते व तुम्हाला समाजात वावरण्यासाठी एक चांगला माणूस घडवते.शाळेतील विविध स्पर्धा तुमच्यातल्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देतात.सर्व स्पर्धात सगळ्यांनी भाग घ्यायला पाहिजे. जरी प्रथम क्रमांक प्राप्त झाला नाही तरी आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.शालेय जीवनात अशा स्पर्धात भाग घेतल्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहचलो आहोत असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक परदेशी यांनी अभ्यासाबरोबर खेळ व्यायाम याचेही महत्त्व सांगितले व निरोगी जीवन जगण्याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला.

प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाचे फळ त्यांना पारितोषकाच्या रूपाने मिळते.माझा विद्यार्थी हा अष्टपैलू विद्यार्थी व्हावा यासाठीच प्रत्येक शिक्षक प्रयत्न करत असतो.प्रशाला त्याबाबतीत नेहमीच सकारात्मक राहते असेही सांगितले.द.ह.कवठेकर प्रशालेच्या आनंदोत्सव कार्यक्रमाच्या अखेरच्या पुष्पाचे म्हणजे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील हा सर्व कार्यक्रम म्हणजे सूत्रसंचालन, स्वागत, प्रास्ताविक, आभार, सगळ्याच गोष्टी विद्यार्थीच संचलन करत असतात. अशी कोणतीही शाळा महाराष्ट्रात नाही की ती विद्यार्थ्यांकडूनच या सगळ्या गोष्टी करून घेते.पण द.ह.कवठेकर प्रशालेचे हेच वैशिष्ट्य आहे की विद्यार्थीच कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन सगळ्याच गोष्टी करतात. त्यामुळेच येथील विद्यार्थी भविष्यात यशस्वी नागरिक बनतात.

प्रमुख अभ्यागतांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. इयत्ता 9 अ मधील कु.सई महेश तेंडुलकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 9 ई मधील अथर्व अमित वाडेकर याने प्रास्ताविक केले.सार्थक लेंगरे,ऋषिकेश तांदळे,करुणा जाधव, सान्वी कलढोणे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार प्रदर्शन उदिता वाडेकर हिने केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपमुख्याध्यापक सुनील रुपनर सर व पर्यवेक्षक आर.एस.कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.प्रशालेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी गीतमंचातील गीत गायले.प्रशालेचे श्री खिस्ते सर व केसकर सर यांनी संगीतसाथ दिली.प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक केसकर आर.जी.व उपमुख्याध्यापक सुनील रुपनर सर यांनी मुलांना स्वखर्चाने खाऊ वाटप केले.

Leave a Reply

Back To Top