पुढील पाच वर्षात २५ हजार नव्या बस खरेदी करणार – मंत्री प्रताप सरनाईक
सोलापूरला लवकरच नव्या बसेस देणार, सुखकर,सुरक्षित प्रवासासाठी शासन प्रयत्नशील

सोलापूर,दि.१९/०२/२०२५(जिमाका) : राज्य शासन दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या बार्शी आगाराला १० नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित ८ आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधनगृहाची पाहाणी केली.प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या बाबतीत अधिकाऱ्याशी चर्चा केली. यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस, बसस्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदने सादर केली.

स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन बसस्थानक सुधारणेबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली. लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी दिली.

येत्या ५ वर्षात २५ हजार बसेस घेणार
यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, भविष्यात सर्व सामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी राज्य शासनाने दरवर्षी 5 हजार नवीन कोऱ्या एसटी बसेस महामंडळाला घेऊन देण्याचे निश्चित केले आहे. याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

या भेटी दरम्यान एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व अन्य अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.