विलेपार्ले पूर्वेतील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि मंदिराच्या पुनर्बांधणीची कारवाई करा – अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी
मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही घाईघाईत मुंबई महापालिका प्रशासनाने मंदीर जमीनदोस्त करुन जैन समाजाच्या भावना दुखावल्या – दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र विरेंद्र पाटील

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०४/२०२५ – बेकायदेशीर म्हणजे illegal आणि अनियमित म्हणजे irregularities यात मोठा फरक आहे.विले पार्ले येथील दिगंबर जैन मंदिर हे बेकायदेशीर नव्हतेच. सोसायटीच्या खुल्या जागेत तीस वर्षापूर्वी तेथील जैन धर्मीय फ्लॅटधारक सभासदांनी सदर मंदिर बांधले होते आणि इतर कोणाचीही या विषयी तक्रार नव्हती. मात्र अलीकडे बिल्डरने सदर जागा एका हॉटेल व्यवसायाला विक्री केली असल्याचे सांगण्यात येते.बाजूलाच त्याचा बार असल्याचे समजते.या व्यक्तीने BMC च्या लोकांना हाताशी घेत मोठा पोलिस फाटा सोबत घेत अचानक आज सकाळी JCB लावून मंदिर उध्वस्त करून टाकले. तेथील भाविकांना जरा देखील अंदाज नव्हता असे काही इतक्या लगेच घडू शकेल.
कोर्ट सुरू व्हायच्या आत हे सगळ अत्यंत वेगाने उरकून टाकण्यात आले.मुद्दा मंदिर पाडण्यापेक्षा ज्या पद्धतीने पाडले गेले त्याचा आहे. राज्यात लाखो बेकादेशीर बांधकाम आहेत मग अशी कोणावर कारवाई केली गेली आहे का ? हा प्रश्न आहे.

ही एक छोटीशी घटना असे कोणास वाटत असले तरी हा जैन धर्मियांसाठी धोक्याचा मोठा इशारा आहे.सत्ता,बळ याच्या ताकदीवर तुमचे उरले सुरले श्रद्धास्थान ताब्यात घेतले जातील.समाजाचा एकही नेता अद्यापही या घटनेचा निषेध करायला पुढे आला नाही हे अत्यंत भयावह संकट आहे.
मुंबईत भाजप चे वर्चस्व आहे.मुंबई मधील जैन धर्मीय समाज हा मोठ्या प्रमाणावर भाजपच्या पाठीमागे असून एखाद्या स्थानिक नेत्याच्या फोन कॉलवरही तोडफोड जागेवर थांबू शकली असती मात्र कोणालाही काहीही पडलेले नाही.तुमच्या मागे कोणतीही राजकीय ताकद नाही इतकी अक्कल किमान दिगंबर जैन धर्मियांनी समजून घ्यावी.मुंबईत प्रत्येक वर्षी पर्युषण काळात मांसाहार बंदीचा खोडसाळपणा करत इतर धर्मियांना उचकवले जाते.अगदी मंदीराच्या प्रवेशद्वारा वर मांसाहारी पदार्थ लटकवतात हे अत्यंत निषेधार्ह आहे.हा केवळ जैन समाज आपल्या पाठीमागे येत नाही याचाही राग असू शकतो आणि जैन समाज शांतताप्रिय आहे त्यामुळे तो आपलं काही वाकडे करु शकत हा समज यामुळे सातत्याने त्याला टार्गेट केले जात आहे.
यांच्या खेळात आज मुंबई मधील एक दिगंबर जैन मंदिर नेस्तनाबूत झाले हे वास्तव स्विकारून किमान याचा काही नाही तर एक निषेधाचा ठराव गावागावातून मुंबई मनपा आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना जाणे जरुरी आहे.
याबाबत अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथील विलेपार्ले पूर्वेतील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि मंदिराच्या पुनर्बांधणीची कारवाई करावी यासाठी निवेदन दिले आहे यात आदरणीय साहेब,आज १६ एप्रिल २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले (पूर्व) येथील दिगंबर जैन मंदिर पाडल्याची बातमी देशभर पसरली आहे.

३० वर्षांहून अधिक काळ जैन भक्त या मंदिरात त्यांची पूजा आणि भक्ती करत होते. ज्या पद्धतीने हे मंदिर पाडण्यात आले ते अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्यामुळे जैन समुदायात संताप निर्माण झाला आहे. या कारवाईमुळे देशभरातील जैन समाज आणि इतर शांतताप्रिय समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या कारवाईमागे काही हॉटेल लॉबीचा वैयक्तिक स्वार्थ असल्याचे बोलले जात आहे आणि म्हणूनच त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेवर प्रभाव टाकून ही कारवाई केली आहे जे अत्यंत निषेधार्ह आहे.कृपया ही बाब गांभीर्याने घेत आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.
महानगरपालिका अधिकारी या मंदिराला कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करणारे बांधकाम म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.पण आपल्याला सगळीकडे अशा प्रकारची हजारो बांधकामे दिसतात.पण ज्या पद्धतीने मंदिरासारखे श्रद्धेचे केंद्र पाडण्यात आले आहे,त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही.संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा आणि मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी अधिकृत व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांना द्यावेत अशी मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विले पार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदीर उध्वस्त केलेल्या महानगरपालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करुन तातडीने जैन मंदीर पुनर्निर्माण करणेबाबत दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र विरेंद्र पाटील यांनी पत्र दिले आहे.
या निवेदनात मुंबई महापालिकेने दि.१६ एप्रिल २०२५ रोजी विले पार्ले पूर्व मुंबई येथील अधिकृत दिगंबर जैन मंदीर पाडल्यामुळे देशभर जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही घाईघाईत मुंबई महापालिका प्रशासनाने मंदीर जमीनदोस्त करुन जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या या जैन मंदिर पाडण्याच्या बेकायदेशीर कृत्याचा दक्षिण भारत जैन सभा निषेध करत आहे.जैन मंदीर पाडलेल्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची आमची मागणी गांभीर्याने घ्यावी.
जैन तीर्थक्षेत्रं आणि मंदिरे ही भारतीय संस्कृतीचे भूषण आहेत. अल्पसंख्यांक जैन समाज हा कायमच देशाच्या विकासासाठी कटीबध्द असून या समाजाचे राज्याच्या चौफेर विकासासाठी मोठे योगदान आहे. गेली अनेक वर्षे मुंबईत अहिंसक दिगंबर जैन समाज या जैन मंदिरात भक्तीभावाने पूजा अर्चना करुन भारतीय संविधानाने दिलेली धार्मिक उपासना श्रध्देने करत आहे. जैन धर्म आणि समाज हा राष्ट्रीय प्रवाहात राहून सांप्रदायिक सहिष्णुता पालन करतो. अशा समाजाचे उपासना स्थळ उध्वस्त करणे हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनीय व समर्थनीय नाही. यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे. याची शासनाने सखोल चौकशी करून अधिकृत जैन मंदीर अनधिकृतपणे उध्वस्त करणाऱ्या संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करावे आणि पूर्ववत जैन मंदीर निर्माण कार्य पूर्ण करुन द्यावे अशी विनंती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र विरेंद्र पाटील यांनी निवेदनामध्ये केली.