पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना
मोबाईल बंदीची होणार कडक अंमलबजावणी ?
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25 :- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणा-या प्रवेशद्वारावर सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरा सदृश्य प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व कर्मचा-यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.कर्मचा-यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त व्हिआयपी गेटचा वापर करण्यात येत आहे.

मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.भाविकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही ते यावेळी श्रोत्री यांनी सांगितले.

मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी ही सर्वांना सारखी असावी कारण अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते मंदिरात फोटो काढून सोशल मिडीयावर टाकत असतात त्यामुळे भाविकांतून नाराजी निर्माण होते त्यासाठी या निर्णयाची कडक अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.

