आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील सतरा विद्यमान सरपंच व 80 ग्रामपंचायत सदस्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची बातमी काही वर्तमानपत्रांमधून आली आहे. मात्र असा आमचा कुठलाही प्रवेश झाला नसून मी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नव्हतो तरीही खोडसाळपणाने आमची नावे घालून बातमी दिली असल्याची माहिती लिंबोणी गावचे लोकनियुक्त सरपंच बिरुदेव घोगरे यांचेसह येड्राव चे सरपंच संजय पाटील, अकोल्याचे उपसरपंच अमोल सरवदे,जालिहाळ सिद्धनकेरी चे सरपंच सचिन चौगुले यांनी लेखी खुलासा माध्यमांशी बोलताना केला आहे.
नुकत्याच काही माध्यमांमधून मुंबई येथील मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रोजगार हमी फलोउत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांचा सतरा सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला होता अशी बातमी माध्यमातून व्हायरल झाली होती. मात्र तसा कोणताही प्रकार घडलेला नाही .काहीजण निधी मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते तो फोटो वापरून प्रवेश झाला अशी बातमी व्हायरल केली असल्याचे काही सरपंचांनी सांगितले आहे. सध्या राज्यांमध्ये महायुतीचे सरकार असून भाजप,शिंदे शिवसेना, अजित पवार हे सर्व मिळूनच आम्ही काम करत असताना आम्ही या गटातून त्या गटात जाण्याचा काही प्रश्नच येत नाही.
सध्या आम्ही भाजपाचे पंढरपूर मंगळवेढा चे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून मी निंबोणी गावचे लोकप्रतिनिधित्व करत आहे.मी अथवा माझ्या सहकाऱ्यांनी कोठेही कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे माध्यमांनी सुद्धा बातमी छापताना कोणाचे एकाचे ऐकण्यापेक्षा सत्यता पडताळणी करून बातमी प्रकाशित करावी. काही लोक पक्षात आपले वजन वाढवण्यासाठी खोटी व चुकीची दिशाभूल करणारी बातमी व्हायरल करून संभ्रम निर्माण करत आहेत मात्र आम्ही असा प्रवेश केला नसून आम्ही आहे त्या पक्षात कायम राहून प्रामाणिकपणे आमची जनसेवा करत आहोत असे लोकनियुक्त सरपंच बिरुदेव घोगरे व इतर सरपंचांनी म्हटले आहे.