मंगळवेढा शहरातील विविध प्रश्न संदर्भात आ आवताडे यांनी घेतली प्रांताधिकार्यांसमवेत आढावा बैठक
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातील देवस्थान इनामी जमीन,शहरा तील होणारी अवजड वाहतूक त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता, मान्सूनपूर्व आलेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात फवारणी, नालेसफाई,भाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत शहरातील नागरिक शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी देवस्थान जमिनी याविषयी शासनाचे धोरण कोणत्याही बाधित शेतकऱ्यावर अन्याय न होता योग्य मार्ग काढला जाईल त्याचबरोबर शहरातील अवजड वाहतुकीमुळे शाळा- कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी,सकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि बस स्टॅन्ड परिसरातील गर्दी यामुळे ही अवजड वाहतूक शहरा बाहेरून कसे जाईल याचे नियोजन व कमान करून अवजड वाहतूक शहरांमध्ये येणार नाही याविषयी या बैठकी मध्ये चर्चा झाली असून यावर योग्य आणि ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश आ. आवताडे यांनी ट्रॅफिक प्रशासनाला दिले आहेत.

मंगळवेढा शहरातील विविध शासकीय योजनांमधून आलेला निधी व रखडलेले कामे त्याचबरोबर शहरातील नालेसफाई, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने फवारणी करणे यासंबंधी आमदार समाधान आवताडे यांनी नगर पालिका प्रशासनास धारेवर धरले व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्या सोडवण्याचे आदेश आ.आवताडे यांनी दिले आहेत.
आठवडा बाजार मंडईमध्ये भाजीपाला व इतर छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांनी यावेळी आपल्या विविध अडचणी आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर मांडल्या असता या व्यापार्यांना त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे करण्यासाठी स्वच्छता आणि इतर मूलभूत व भौतिक सुविधा पुरविण्याचे आ.आवताडे यांनी सूचित केले.
या बैठकीला प्रांताधिकारी बी आर माळी, मुख्याधिकारी चरण कोल्हे,प्रा.येताळा भगत, राजेंद्र सुरवसे,प्रकाश गायकवाड, नारायण गोवे,अजित जगताप,प्रविण खवतोडे,डॉ अशोक सुरवसे,अशोक माळी,महादेव जाधव,वारी परिवाराचे सतिश दत्तु,सुदर्शन यादव, दिगंबर यादव, बाबा कोंडूभैरी,मनोज माळी, अशोक भगत, सागर केसरे, प्रफुल्ल सोमदळे आदी मंडळी तसेच पोलीस, महसूल, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर विभागांचे अधिकारी, पदाधिकारी स्थानिक व्यापारी उपस्थित होते.