कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०९ वाहनचालकांवर कारवाई; ३,४९,९५० रुपयांचा दंड वसूल
कोल्हापूर शहरात वाहतूक नियंत्रण शाखेची विशेष मोहीम:४०९ वाहन चालकांवर कारवाई करून ३,४९,९५० रुपयांचा दंड वसूल. तिप्पल सीट, मोबाईल वापर,कर्णकर्कश हॉर्न व परवाना नसलेल्या चालकांवर कठोर कारवाई.
रात्री विशेष मोहिमेत तिप्पल सीट, मोबाईल वापर, कर्णकर्कश हॉर्न व परवाना नसलेल्या चालकांवर कठोर कारवाई
कोल्हापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० फेब्रुवारी २०२६ : शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोठी कारवाई करण्यात आली. दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं.११.०० ते १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी तपासणी नाकाबंदी करण्यात आली.
- या मोहिमेत एकूण ४०९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या कडून ३,४९,९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कारवाईतील प्रमुख उल्लंघन:
तिप्पल सीट प्रवास,वाहन चालविताना मोबाईलचा वापर,म्युझिकल व कर्णकर्कश हॉर्नचा वापर,प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे,मद्यप्राशन करून वाहन चालविणे,वाहनांमध्ये अनधिकृत मॉडिफिकेशन,परवाना जवळ न बाळगणे / परवाना नसणे.
विशेष म्हणजे डुप्लिकेट सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न असलेल्या सुमारे ३२ वाहनांवर तात्काळ कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आली. कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेकडून विशेष कारवाई करण्यात आली.या मोहिमेत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे,पोनि डोके,पोनि कन्हेरकर, पोनि होडगर व पोनि लोढे यांच्या निरीक्षणाखाली तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकांमार्फत संयुक्तरित्या ही कारवाई राबविण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून अशी विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल,असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
