आटपाडीत प्रा.विश्वनाथ जाधव स्मृतिदालन साकारा – सादिक खाटीक

आटपाडीत प्रा.विश्वनाथ जाधव स्मृतिदालन साकारा – सादिक खाटीक यांची मागणी

आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .३१/०५/ २०२५- माणदेशा तील ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू शिक्षक आणि सामाजिक जाणिवांचा आवाज असलेल्या प्रा.विश्वनाथ जाधव यांच्या नावाने आटपाडी येथे स्मृतिदालन सुरू करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे.

प्रा .विश्वनाथ जाधव सरांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आटपाडी येथे मुलुख माणदेश झपाटलेली माणसे या पुस्तकांचा आणि सरांच्यावरील विश्वम या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे .या पार्श्वभूमीवर सादिक खाटीक यांनी केलेल्या मागणीचे सर्व स्तरातून स्वागतच होईल असे वाटते आहे .

प्रा. विश्वनाथ जाधव सरांचे कार्य केवळ अध्यापनापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना विचारांची दिशा दिली, वाचनसंस्कृती रुजवली आणि संवेदनशील सामाजिक भान दिले. त्यांच्या विचारविश्वाचे, साहित्याचे आणि कार्याचे दस्तऐवजीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे, असे सादिक खाटीक यांनी सांगितले.

जाधव सरांनी आपल्या विविध पुस्तकांद्वारे माणदेशाच्या सांस्कृतिक इतिहासाला साहित्यिक मांडणी दिली आहे. त्यांच्या लेखनाची दखल घेत राज्य साहित्य पुरस्कार, शिक्षक भूषण सन्मान, तसेच विविध संस्थांचे गौरव त्यांना लाभले होते.

आटपाडी येथे उभारले जावे अशी अपेक्षा असलेल्या  स्मृतिदालनात त्यांची प्रकाशित पुस्तके,अप्रकाशित टिपणांचा संग्रह,भाषणांचे ध्वनी-व्हिडिओ संग्रह, विद्यार्थी-शोधकांच्या आठवणी तसेच त्यांना मिळालेले पुरस्कार व प्रमाणपत्रे ठेवावीत.हे दालन नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.ज्याठिकाणी त्यांनी आयुष्यभर कार्य केले,त्याच ठिकाणी त्यांची स्मृती जपली जाणे हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.आटपाडी येथे त्यांनी सेवा बजावलेल्या महाविद्यालयात ग्रंथालय अभ्यासिकेला त्यांचे नाव देणे सहज शक्य आणि सर्वमान्य होते का हे पाहावे किंवा महाविद्यालयातील एखाद्या विभागाला त्यांचे नांव देवून जाधव सरांच्या स्मृति चिरंतन जपता येतील का ? यावरही विचार व्हावा.आटपाडी एज्युकेशन सोसायटी चे सर्वेसर्वा अमरसिंहबापू देशमुख हे या मागणीचा अवश्य विचार करतील अशी आपणास अपेक्षा आहे,असे सादिक खाटीक म्हणाले.    

Leave a Reply

Back To Top