पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे
सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा
सोलापूर / जिमाका, दि.०५/०६/२०२५ :- महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्कतेने रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा सेल मध्ये नोंद होणाऱ्या गुन्ह्याबाबत तात्काळ कार्यवाही करून गुन्हे निकाली काढावेत. तसेच समाजातील एकाही महिलेवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही यासाठी पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे असे सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे बोलत होत्या.यावेळी सोलापूर महानगर पालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे,सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त रवि पवार,पोलिस उप आयुक्त दिपाली काळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सोलापूर एस.टी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी उपस्थित होते.

उपसभापती नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की,महिलांना भरोसा कक्षाच्या माध्यमातून दक्षता समिती सक्षम करण्याची गरज आहे. दक्षता समितीने प्राचार्य,सरपंच,शिक्षीका, प्राध्यापिका, समाजसेविका यांना कौटुंबिक संरक्षण कायद्याचे प्रशिक्षण द्यावे.जिल्हा परिषद, महिला बाल विकास विभाग,पोलिस विभाग यांनी एकत्र येत लोक अदालत आयोजित करावी. कौटुंबिक गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त समझोता करत असतांना नुसता नांदण्यासाठी दबाव आणून हुंडा , हिंसा,व्यसने स्विकारण्यास भाग पाडून समझोता करू नये. केस हाताळतानाच्या कार्यप्रणाली तयार करून नंतर दक्षता समिती सदस्यांना व बीट पोलीसांना गृहभेटी देण्यास सांगावे. महिलांच्या सुरक्षिततेची खात्री झाल्यावरच समझोता करावा असे त्यांनी पोलीसांना सांगितले.
जिल्हा परिषदेने महिलांच्या गरजा लक्षात घेऊन पतपेढी, गुंतवणूक, कर्ज उपलब्ध करून महिलांच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे.शासनाच्या जास्तीत जास्त सोयी सुविधा देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करावा.सोलापूर महापालिकेने नागरिकांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा तसेच शहरामध्ये स्वच्छता राहील या अनुषंगाने प्रयत्न करावेत. पावसाळ्यातील ड्रेनेज ची कामे व्यवस्थितपणे झाली आहेत की नाहीत याची खात्री करावी.
पंढरपूर येथील आषाढी वारीच्या अनुषंगाने एस.टी.स्थानकाची स्वच्छता करावी .वारी साठी एस.टी महामंडळाने सुस्थितीत गाड्या देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

