उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र या..शिवसेना युवासेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घातले विठ्ठलास घातले साकडे
महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्या साठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी शिवसेना युवासेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घातले विठ्ठलास साकडे घातले.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे परिवार म्हणजेच दोन्ही बंधू राज व उध्दव हे एकत्र येणार अशा जोरदार चर्चा होत असताना आता दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडूनही एकत्र येण्याची हाक या दोन्ही नेत्यांना दिली जात आहे.याचा एक भाग म्हणुन आज पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर नामदेव पायरी येथे शिवसेना युवासेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज आणि उध्दव ठाकरेंच्या एकत्रित येण्यासंदर्भा तील आशयाचे बॅनर्स हातात धरत घोषणा बाजी केली आणि विठ्ठल रखुमाई मुर्तीस दुग्धाभिषेक करत दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी एक व्हावे यासाठी विठ्ठलास साकडे घातले.
यावेळी बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे म्हणाले की,शिवसेना आणि मनसे यांचे प्रेरणास्थान हे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब आहेत.विचारधारा देखील दोन्ही पक्षाच्या एकसमानच आहेत.त्यामुळे आता दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी मनावर घेतल्यास निश्चित महाराष्ट्रातील जनतेला आनंद वाटेल,म्हणूनच आम्ही आज विठ्ठलास साकडे घालत आहोत,असे सांगितले.

युवासेनेचे सडेतोड वक्ते रणजित बागल यांनी बोलताना उध्दव साहेब व राज साहेब हे दोन्ही नेते महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा ठेवतील आणि जनतेला या हुकूमशाही विरोधात एक सक्षम पर्याय देतील अशी लोकांना आशा आहे.महाराष्ट्रात ठाकरे हा ब्रॅण्ड टिकला का पाहिजे ? कारण तो टिकला तरच मराठी माणूस स्वाभिमानाने जगेल म्हणुनच दोन्ही नेत्यांचे सुर जुळले पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली.
मनसेचे पदाधिकारी आप्पासाहेब कर्चे म्हणाले की,मराठी माणुस केंद्रबिंदु ठेवुन दोन्ही पक्षांना आता हातात हात घालून लढाई लढावी लागेल,महाराष्ट्रातील जनता ही राजसाहेब व उध्दवसाहेब यांच्या एकत्रित येण्यासाठी आतुरली आहे.

जनतेला आवडणारे समीकरण तयार झाल्यास जनमत देखील प्रचंड प्रमाणात या दोन्ही पक्षांचे वाढेल व महाराष्ट्राची ताकद देखील इतरांना समजेल असे मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.यावेळी विठ्ठल मुर्तीस अभिषेक करत मोठी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.यावेळी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक,मनसैनिक व नागरिक उपस्थित होते.

