दर्शनरांगेतील बॅरिकेटींग कामाची ई निविदा व गोशाळेतील नवजात वासरू मयत झालेबाबतच्या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त,
पंढरपूर दि.13:- दर्शनरांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निविदेबाबत श्री पुरुषोत्तम सग्गम, सोलापूर यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी तसेच गोशाळेतील नवजात वासरू मयत प्रकरणी मंदिर समितीच्या दि.23 जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सदर अहवालाच्या अनुषंगाने मंदिर समितीची दि.13 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता मंदिर कार्यालयात सह अध्यक्ष औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.या सभेत सदस्या शकुंतलाताई नडगिरे,डॉ दिनेशकुमार कदम,संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड.माधवीताई निगडे,ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक मुकेश अनेचा आदी उपस्थित होते.

या सभेत मंदिर समितीच्या दि.23 जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल स्विकारण्यात आला.याशिवाय व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना अधिनियमातील तरतुदीनुसार शासनास परत पाठविण्याचा तसेच श्री सग्गम यांचेवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणेकामी ठराव मंजुर करून शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविणे तसेच गोशाळेतील वासराच्या मृत्यू प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड, तानाजी जाधव व योगेश पाठक हे कर्मचारी सकृतदर्शनी दोषी असल्याचे दिसून आले आहे.याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड यांच्याकडे पशुवैद्यकीय अधिकारी पदाची शैक्षणिक पात्रता नसल्याने त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चौकशी समितीच्या अध्यक्षा ॲड माधवीताई निगडे यांनी सांगितले.