कोरोनानंतर संवादाची मोठी गरज होती आणि दक्षिण पुण्यातील ही गरज ऐश्वर्य कट्ट्याने पूर्ण केली – डॉ. नीलमताई गोऱ्हें

त्या आल्या… त्यांनी पाहिले… त्यांनी जिंकले

ऐश्वर्या कट्ट्यावर डॉ. नीलमताई गोऱ्हेंनी जिंकली सर्वांची मने

पुणे /डॉ.अंकिता शहा- साहित्याचा समृद्ध वारसा, प्रगल्भ वैचारिकता, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण, प्रदीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकीर्द तसेच महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने काम करणारे कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे. त्यांची ऐश्वर्य कट्ट्यावर झालेली उपस्थिती सर्वांसाठी समृद्ध करणारी ठरली.पुणे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय क्षितीजा वर त्यांची ओळख सर्वश्रुत आहे, त्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात आणि भगवे झेंडे नाचवून झालेले त्यांचे स्वागत आगळेवेगळे होते.

व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी कट्ट्यावर दीड-दोन तास मनमोकळ्या गप्पा मारल्या.या संवादात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची चर्चा झालीच,पण त्यांच्या जीवन प्रवासाचीही समृद्ध झलक अनुभवायला मिळाली.सर्वजण खुल्या मनाने संवाद साधतात हे पाहून मला खूप आनंद झाला.कोरोनानंतर संवादाची सर्वात मोठी गरज होती आणि दक्षिण पुण्यातील ही गरज ऐश्वर्य कट्ट्याने पूर्ण केली आहे, असे त्या म्हणाल्या.

आपल्या जडणघडणीचा उल्लेख करताना त्यांनी शालेय जीवनापासूनच सामाजिक कामाची गोडी कशी लागली, युवक क्रांती दलातील सहभागातून ग्रामीण प्रश्नांची जाणीव कशी झाली, जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभागी होताना सामाजिक भान अधिक कसे पक्के झाले, हे सांगितले. पुढे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याची मिळालेली संधी, तीर्थक्षेत्रांचा विकास आणि जगभरातील महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याचे अनुभव त्यांनी मांडले. विधानपरिषद उपसभापती म्हणून केलेले नियोजन, काही गंमतीशीर किस्से तसेच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींनी उपस्थित वातावरण भारावून टाकले.

“सन्मान मागायचा नसतो, तो कामातून मिळवायचा असतो,” हे बाळासाहेबांचे वाक्य त्या आठवताना विशेष भावुक झाल्या. आजच्या राजकारणावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “समाजाचंच प्रतिबिंब राजकारणात उमटतं.” तसेच, जर राजकारणात आल्या नसत्या तर डॉक्टर म्हणून सैन्यात सीमेवर सेवा करण्याची त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिलांवरील अत्याचारांची जागतिक उदाहरणे सांगताना क्षणभर वातावरण गंभीर झाले, तर त्यांच्या वैयक्तिक अनुभवांनी आणि प्रेरणादायी प्रवासाने कट्ट्यावर आलेल्या प्रत्येकाला उभारी दिली.

आजच्या ऐश्वर्य कट्ट्याला माझ्यासह रमेश बाप्पू कोंडे, किरण साळी, दत्ता जोरकर, आप्पा रेणुसे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कट्ट्याचा हा अनुभव सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Back To Top