पंढरपूरच्या जैन मंदिराचे व धर्मशाळेचे पावित्र्य अस्तित्व अबाधित राहावे — आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी


दक्षिण भारत जैन सभेचा सहानुभूतीचा हात — मराठवाडा पूरग्रस्तांना अकरा लाखांची मदत

देवेंद्र फडणवीस : नैसर्गिक आपत्ती आली की दक्षिण भारत जैन सभा नेहमीच पुढे— मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सभेची देणगी

जैन समाजाचा मानवतेचा आदर्श — पूरग्रस्त मदत आणि पंढरपूर जैन मंदिर रक्षणासाठी दक्षिण भारत जैन सभेचा पुढाकार
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या जनजीवनाच्या व पशुधनाच्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारत जैन सभेने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली. मुक्या प्राण्यांना चारा पुरवणे, नागरिकांना आवश्यक सहाय्य देणे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल अकरा लाख रुपयांची देणगी देत सभेने मानवतेचा उत्तम आदर्श घालून दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेचे या मोलाच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानत म्हटले, राज्यावर जेव्हा जेव्हा संकटे येतात, तेव्हा दक्षिण भारत जैन सभा नेहमीच तत्परतेने मदतीला धावून येते. शासन त्यांच्या या योगदानाचे मनापासून कौतुक करते.
मुंबईत झालेल्या भेटीत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व शिरोळचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांना रु.११ लाखांचा चेक सुपूर्द केला.
यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या संदर्भातही जैन समाजाच्या भावना सभेच्या वतीने मांडण्यात आल्या.
सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे प्राचीन भ.पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर तसेच त्यागी व भक्त निवास इमारती यांच्या पवित्रतेचे आणि अस्तित्वाचे रक्षण करण्याची विनंती केली.
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले की, “पंढरपूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना जैन मंदिर किंवा संबंधित इमारतींची कोणतीही हानी होणार नाही.शासनाची भूमिका पूर्णपणे सकारात्मक राहील.”
या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे देखील उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर येथील जैन समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या शांतीसागर जैन धर्मशाळेस प्रस्तावित कॉरिडॉरमुळे बाधा येत असल्याच्या नोटीसविरुद्ध आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,पंढरपूर येथील सी.स. नं. 2197 या जागेवरील पुरातन शांतीसागर धर्मशाळा आणि मुनी त्यागी निवास हे अनेक दशकांपासून धार्मिक कार्यासाठी वापरात असून,ते श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरालगत असल्यामुळे जैन समाजासाठी अत्यंत पवित्र स्थान आहे.या धर्मशाळेला पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत रस्ता रुंदीकरण आणि कॉरिडॉर प्रस्तावामुळे बाधा येणार असल्याची नोटीस (पत्र क्र. पंनपं/न.र./4690/346/2025, दि. 09.09.2025) प्राप्त झाली आहे.
जैन बांधवांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवत जैन मंदिरासह धर्मशाळेचे अस्तित्व अबाधित ठेवावे अशी मागणी आमदार पाटील यांच्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्पष्ट केले की,ही धर्मशाळा केवळ इमारत नाही, तर जैन धर्मीयांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. येथील मुनी महाराज व त्यागी यांचे निवासस्थान अबाधित राहणे हे समाजाच्या भावना जपणारे पाऊल ठरेल.शासनाने या प्रकरणात संवेदनशीलता दाखवून धर्मशाळेस आलेली बाधित नोटीस तात्काळ रद्द करावी,अशी त्यांनी विनंती केली आहे.





