अजित पवारांची अंबाजोगाईत गर्जना: ३२ पैकी ३२ मिळाले तर अंबाजोगाईचा बारामतीसारखा वेगवान विकास
अंबाजोगाईच्या सभेत अजित पवारांचा विश्वास: लोकविकास महाआघाडीच शहराचा भविष्यकालीन चेहरा बदलेल
अंबाजोगाई जि.बीड /ज्ञानप्रवाह न्यूज | दि.२४ नोव्हेंबर २०२५– मराठी भाषेची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र अंबाजोगाई नगरीत बोलताना नेहमीच अभिमान वाटतो, अशा भावनांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत नागरिकांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयासारखं आशिया खंडातील पहिलं तालुका ठिकाणचं महाविद्यालय इथे उभं राहिलं, ही अंबाजोगाईची परंपरा, इतिहास आणि अभिमान आहे.लोकविकास महाआघाडीने उमेदवार निवडताना सर्व घटकांचा विचार केला असून नगराध्यक्षपदासाठी राजकिशोर मोदी यांची निवड ही सर्वसमावेशक नेतृत्वाचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
३२ पैकी ३२ जागा आम्हाला मिळाल्या तर अंबाजोगाईचा विकास बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर करू. अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांचा सुंदर मेळ घालून प्रामाणिक कामांद्वारे शहराचा चेहरामोहरा बदलू,असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

सभेत पुढे बोलताना अजित पवार म्हणाले,शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला सक्षमीकरणाला प्राधान्यनविन तंत्रज्ञानावर आधारित उत्तम दर्जाच्या सुविधा व प्रकल्प उभारणार,अंबाजोगाईला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून स्थानिकांना रोजगार,
अहिल्यानगर–बीड रेल्वे पुढे पुणे– मुंबईपर्यंत नेण्यासाठी प्रक्रिया सुरू,बीड विमानतळ पूर्णत्वास गेल्यावर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलेल.

अजित पवार यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन करताना म्हटले,लोकविकास महाआघाडीचे सर्व उमेदवार अनुभव, दृष्टी आणि विकासाची हमी घेऊन उभे आहेत. त्यांना मोठ्या मतांनी विजयी करा. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी ते सक्षम आहेत.

