आचार्यश्री विद्यानंद.. बाहुबलीवरील संघर्ष आणि सोलापूर पोलिसांनी मला व प्रा.प्रदीप फलटणे पुणे यांना केलेली अटक – प्रा.एन.डी.बिरनाळे
ज्ञानप्रवाह न्यूज – १४ डिसेंबर,१९८३ च्या रात्री ९वा .. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचा मला कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये फोन आला.. बाहुबलीसाठी नेमिनाथ मरायची तयारी असेल तर जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये ताबडतोब या.. येताना आणखी कोणाची तशी तयारी असेल तर त्यांना घेऊन या.. एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला. स्व. रावसाहेब चौगुले तयार झाले.. आम्ही दोघे रात्री १० च्या कोल्हापूर – सोलापूर एस. टी. ने जयसिंगपूर स्टँडवर येऊन चालत कल्पवृक्ष गार्डन मध्ये आलो. तेथे काही वीर सैनिक जमले होते.. वीराचार्यांचा जयजयकार सुरु झाला..

वीराचार्य वाणी धडाडू लागली..वीर सैनिकांनो आपले बाहुबली क्षेत्र अडचणीत आले आहे.एलाचार्य विद्यानंद आणि गुरुदेव समंतभद्र महाराजांवर पोलिसांचा मोठा उपसर्ग होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एक मोहीम फत्ते करायची आहे.. उद्या बाहुबली डोंगरावर पोलिसांचा वेढा पडण्याची दाट शक्यता आहे..दगाफटका होण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबरला पोलीस चाल करुन महाराजांना त्रास देण्याची शक्यता आहे. आपण सर्व १५ तारखेलाच रात्री नरंदे घाटातून पश्चिम बाजूने डोंगरावर मध्यरात्री चाल करुन बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या हातातून बंदूका हिसकावून त्यांना वरुन खाली ढकलून डोंगराचा ताबा घ्यायचा आहे.हे करताना मृत्यू आला तरी अहिंसेच्या रक्षणासाठी हा त्याग करायला तयार रहा .
हा प्लॅन भिसीकर गुरुजींना समजला.. त्यांनी याला विरोध केला. काहीही धोका होणार नाही. तुम्ही कोणीही इकडे येऊ नका.वीराचार्य बाबासाहेबांचा नाईलाज झाला. प्लॅन रद्द झाला. पण बाबासाहेबांना उपसर्ग होणार याची पुरेपूर कल्पना होती. हातकणंगले जवळ बाहुबलीला जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड लावून रस्ता तर बंद केला होता..पण आम्ही आडरानातून बाहुबलीला पोहचलो.. तसे परिसरातून अनेक जैन श्रावक श्राविका.. वीर सैनिक आधी पोहचले होते.. १६ तारखेला समाजकंटकांचा मोर्चा डोंगरावर जाणार होता.

एलाचार्य विद्यानंद महाराजांचे प्रवचन संपत आले होते.तेवढ्यात समाजकंटकांचा मोर्चा घुसला.. आम्ही पळत जाऊन डोंगराच्या पहिल्या पायरीवर साखळी करुन मोर्चेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.. झटापट सुरु झाली. आम्ही जोशाने गुरुदेव समंतभद्र आणि भ. गोमटेशांचा जयजयकार करत तुटून पडलो.मोर्चेकरी पांगले.. पळापळ सुरु झाली.. तेवढ्यात पोलिसांनी एलाचार्य विद्यानंद, गुरुदेव समंतभद्र आणि भिसीकर गुरुजी यांच्या छातीवर बंदूका लावल्याची बातमी आम्हाला कळाली.. आम्ही त्वेषाने चाल करुन बंदूका हिसकावून घेतल्या.. मोठी झटापट सुरु झाली.. प्रवचनाला आलेल्या लोकांवर लाठीमार सुरु झाला.. सारे सैरावैरा धावू लागले.. दहा मिनिटांत परिसर रिकामा आणि शांत झाला..मला आणि प्रा.प्रदीप फलटणे यांना भिसिकर गुरुजींच्या निवासाशेजारील खोलीत कोंडून कुलुप लावण्यात आले.
रात्री दहा वाजता एलाचार्य महाराजांनी फलटणे व मला बोलावून घेतले. झाल्या प्रकारावर रात्री बारा वाजेपर्यंत एक निवेदन तयार करा.. आणि सन्मती प्रेसमध्ये पहाटे पर्यंत छापून घ्या.
सोलापूरला जनता पक्षाचे अधिवेशन चालू आहे. त्याठिकाणी सर्व नेत्यांना व लोकांना वाटा.. त्यांनी व भिसिकर गुरुजी यांनी कांही मुद्दे दिले. दोन तासात आम्ही निवेदन तयार केले. एलाचार्य महाराजांना वाचून दाखवले.. ते म्हणाले, उत्कृष्ट झाले आहे. सन्मती प्रेसमध्ये छापून दोन गठ्ठे तयार करुन आम्ही बाहेर पडलो. बारा वाजता सोलापुरात पोहचलो. अधिवेशन स्थळी गेलो.प्रा.फलटणे मला म्हणाले, ‘तुम्ही व्यासपीठावर निवेदन वाटा मी मंडपात लोकांना वाटतो.. मी व्यासपिठावर आणि फलटण मंडपात वाटत होते. तेवढ्यात एका नेत्यांनी मला विचारले,काय वाटतय? बाहुबली डोंगरावर झाल्या प्रकाराची चौकशी होऊन पोलिस आणि समाजकंटकावर कारवाई झाली पाहिजे या मध्ये आपण लक्ष घालावे अशी मागणी असलेले निवेदन, मी म्हणालो.. दुसऱ्या नेत्यांनी सरळ पोलिसांना बोलावून मला व फलटणे यांना सोलापूर पोलिस कस्टडीत टाकले. प्रा. फलटणे आणि दै. संचारचे संपादक रंगा वैद्य यांची मैत्री होती.. त्यांच्याकडे फलटणे यांनी अटकेची वार्ता पोहोच केली.. वीराचार्य बाबासाहेब यांच्या वाणीत एवढी ताकद होती. आम्हाला पोलिसांची भिती तर वाटलीच नाही उलट फलटणे आणि मी रात्रभर विनोद करत हसत रात्र काढली. सकाळी ६वा रंगा वैद्य यांच्यामुळे आम्ही बाहेर आलो.. तेथून वडगाव मावळ(पुणे) येथे फलटणे यांच्या रुमवर एक दिवस राहून परतलो..
दुसऱ्या दिवशी भिसीकर गुरुजी व एलाचार्य विद्यानंद महाराज आणि वीराचार्य बाबासाहेब यांना हकिकत सांगितली..त्यावेळी वीराचार्य म्हणाले, ‘नेमिनाथ आपली तीर्थक्षेत्रं, साधू – आर्यिका, मंदीरं आणि समाजाच्या रक्षणासाठी प्राण गेला तरी बेहत्तर..! पोलिसांनी दोन्ही महाराज व भिसिकर गुरुजींच्या छातीवर बंदूका लावल्या तरी त्यांची स्थितप्रज्ञता अलौकिक होती..

