कोल्हापूर जैन बोर्डिंग व्यायामशाळा प्रकरण
वीराचार्यांनी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूला चीतपट केले..- प्रा.एन.डी.बिरनाळे
सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज – दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये पूर्व बाजूला अधीक्षक निवास स्थानाच्या उत्तर बाजूला विद्यार्थ्यांना व्यायामासाठी स्व. तात्या पाटणे यांच्या पुढाकाराने व्यायामशाळा बांधण्यात आली. व्यायामासाठी आवश्यक ती साहित्य साधने बोर्डिंगच्या मालकीची होती. कोल्हापुरातील एक राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूंनी त्या ठिकाणी दररोज व्यायाम करण्यासाठी तात्यांना विनंती करुन परवानगी घेतली. आठ दहा शरीरसौष्ठवपटू पहाटे पाच वाजता व्यायामाला यायचे. पाच वर्षे हा त्यांचा दिनक्रम सुरु होता. परंतु दुर्दैवाने त्या राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूला दुर्बुद्धी सुचली.. व्यायामशाळेवर कब्जा करण्याचा त्यांने गुप्त कारस्थान केले. एके दिवशी पहाटे चार वाजता येऊन व्यायामशाळेतील सर्व साहित्य साधनावर पांढऱ्या रंगाने स्वतःचे नाव लिहिलं आणि प्रवेश दाराजवळ डाव्या हाताला व्यायामशाळेला त्यांच्या नावचा बोर्ड लावला. सकाळी ही बाब माझ्या लक्षात आली. मी तातडीने तात्या पाटणे यांना फोन केला. तात्यांनी बाबासाहेबांना बोलावून घ्या असे सांगितले. मी फोन करुन बाबासाहेबांना यायची विनंती केली. ते तातडीने आले.. तो सारा प्रकार पाहिला. रात्री आठ वाजता त्यांनी विद्यार्थ्यांना चतुरबाई हाॅल मध्ये बोलावून काय करायचे याची माहिती दिली.

वीराचार्य गरजले,कोणत्याही परिस्थितीत त्या शरीरसौष्ठवपटूला व्यायामशाळेत पाय ठेवू द्यायचे नाही. व्यायामशाळेच्या दारावर साखळी करुन राहायचे.कोणीही मागे हटायचे नाही.
तो पिळदार बलदंड देहयष्टीचा.. सहा फूटाहून अधिक उंच..त्याच्या बरोबर पुन्हा सात आठ थोड्या फार फरकाने बलंदड ताकदीचे शरीरसौष्ठवपटू.. विद्यार्थ्यी तणावात आले.
वीराचार्य बाबासाहेब म्हणाले,’ आपण क्षत्रिय आहोत.. सम्राट खारवेलचे वारसदार.. कोणाला घाबरायचे कारण नाही.. मी दारासमोर मध्यभागी आणि आपण माझ्या हातात हात घालून दोन्ही बाजूला साखळी करुन उभे रहायचे..! बाबासाहेबांच्या उजव्या बाजूला त्यांच्या हातात हात घालून उभा होतो.. कुंभोज, यळगुड, हुपरी, माणगाव, राधानगरी, नागाव, हालोंडी, हेरले, सांगवडे, वसगडे, रेंदाळ,चोकाक, तमदलगे, जैनापूर, चिपरी व अन्य गावातील जैन विद्यार्थ्यांनी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांना दिलेली साथ अंगावर शहारे आणणारी होती..वीराचार्य उण्यापुऱ्या पावणेपाच फूट उंचीचा धाडसी माणूस.. जैन धर्म आणि समाजाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेतलेला प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचा खरा भक्त.. गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या संस्काराने मंडीत झालेला जैन वीर..!
प्लॅन ठरला.. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता शरीरसौष्ठवपटू सात आठ साथीदारासह मेन गेटमधून आत आला.. पश्चिम बाजूच्या जुन्या इमारतीला वळसा घालून चतुरबाई हाॅल समोर येताच त्याला वीराचार्य बाबासाहेबांची फौज दिसली.. त्याला काय उपरती झाली कोणास ठाऊक..तेथूनच त्याने पाय काढता घेतला..
याला म्हणतात धाडस, शौर्य आणि पराक्रम.. वीराचार्य म्हणाले, ‘नेमिनाथ, दक्षिण भारत जैन सभा आणि बोर्डिंग ही आपली तीर्थक्षेत्रं आहेत. त्यांच्या रक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर..! असे होते वीराचार्य..!





