सोलापूरात उत्साहात साजरा महाराष्ट्र दिन; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
डिजिटल जनगणनेला सुरुवात; नागरिकांनी सहभाग नोंदवावा – जयकुमार गोरे यांचे आवाहन
सोलापूरात महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी डिजिटल जनगणनेत नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांचा आढावा.

सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,१ मे २०२६ : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर पोलीस परेड ग्राउंड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना यावेळी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. यासोबतच उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी एक महत्त्वाची घोषणा करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, आजपासून भारताची १६ वी आणि स्वातंत्र्या नंतरची ८ वी जनगणना सुरू होत आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान नागरिकांना स्व- जनगणनेत सहभागी होता येणार आहे. नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस महासंचालक पदक विजेते, क्रीडा, महिला व बालविकास विभागातील मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना कृषी, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, विमान सेवा आणि प्रस्तावित आयटी पार्क यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प जिल्ह्याच्या प्रगतीला नवी गती देत असल्याचे नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनय कोंड्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


