भारताचा चहा आयातीवर मोठा निर्णय; टेस्टिंगशिवाय विक्रीला पूर्ण बंदी
दार्जिलिंग चहाचे ब्रँड संरक्षण; नेपाळमार्गे येणाऱ्या चहावर भारताचे कडक निर्बंध
नवी दिल्ली, दि.२९/०४/२०२६ — भारत सरकारने नेपाळ मधून व मार्गे इतर देशांतून आयात होणाऱ्या चहावर कडक निर्बंध लागू केले असून आता गुणवत्ता तपासणी (टेस्टिंग) केल्याशिवाय असा चहा भारतीय बाजारात विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे सीमावर्ती व्यापार, चहा उद्योग आणि ग्राहक सुरक्षेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामागे मुख्य उद्देश म्हणजे देशात विकल्या जाणाऱ्या चहाची गुणवत्ता,शुद्धता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे.काही काळापासून नेपाळ मधून व मार्गे तृतीय देशांतील चहा भारतात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.या चहाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असल्याने सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.
नव्या नियमांनुसार, प्रत्येक आयातीत चहाच्या खेपेतून नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तपासणीत रासायनिक घटक, गुणवत्ता मानके आणि अन्नसुरक्षा निकषांची पूर्तता तपासली जाणार आहे. तपासणीत अपयशी ठरलेल्या चहाला बाजारात विक्रीस बंदी असेल.

जारी अधिसूचनेनुसार (SOP), प्रत्येक खेपेसाठी सॅम्पलिंग आणि टेस्टिंग अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, इंस्टंट टी आणि रेडी-टू-ड्रिंक चहाला या नियमातून सूट देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आसाम, दार्जिलिंग आणि दक्षिण भारतातील चहा उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः दार्जिलिंगमधील उत्पादकांनी दीर्घकाळापासून स्वस्त चहा दार्जिलिंग टी म्हणून विकला जात असल्याची तक्रार केली होती, ज्यामुळे त्यांच्या दर्जेदार उत्पादनाच्या बाजारपेठेला फटका बसत होता.
भारताच्या या कठोर भूमिकेकडे ब्रँड संरक्षण म्हणून पाहिले जात असून, दार्जिलिंग चहाची जागतिक ओळख आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, चहा उद्योगात पारदर्शकता आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत करणार आहे. मात्र, अंमलबजावणी प्रभावी झाली तरच याचे अपेक्षित परिणाम दिसून येतील.






