पंढरपूर सायकलर्स क्लबचा ८ वा वर्धापन दिनी पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सायकलवीरांचा गौरव

पंढरपूर सायकलर्स क्लबचा ८ वा वर्धापन दिनी पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सायकलवीरांचा गौरव

स्वच्छ,सुंदर आणि तंदुरुस्त पंढरपूरचा संदेश; पंढरपूर सायकलर्स क्लबची भव्य जनजागृती रॅली संपन्न

Pandhapur cycle news : पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ जून : जागतिक सायकल दिन (३ जून) व जागतिक पर्यावरण दिन (५ जून) यांचे औचित्य साधून पंढरपूर सायकलर्स क्लबचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सायकल जनजागृती रॅलीला सायकलप्रेमी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पर्यावरण संवर्धन,निरोगी जीवनशैली आणि वाहतूक कोंडी व प्रदूषणमुक्त शहराचा संदेश देत शेकडो सायकल स्वारांनी रॅलीत सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास क्लबचे संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर,पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे,गणेश पाटील,शशिकांत कराळे,प्रथमेश वांगीकर तसेच सायंकाळच्या सन्मान सोहळ्यास प्रशांत खलिपे, प्रणव परिचारक,शार्दूल नलबिलवार आणि जहूर खतिब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सायंकाळी पंतनगर कार्यालय येथे आयोजित सन्मान सोहळ्यात पर्यावरण संरक्षण,आरोग्य जागृती आणि सायकल संस्कृतीच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या सायकलवीरांना पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी सायकल ही काळाची गरज असल्याचे सांगत जास्तीत जास्त नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी पंढरपूर सायकलर्स क्लब गेली आठ वर्षे सातत्याने आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल कौतुक व्यक्त केले.भविष्यात सायकल चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली पाहिजे, प्रत्येक कुटुंबाने सायकलचा स्वीकार केला पाहिजे आणि तरुण पिढीने सायकलकडे केवळ छंद म्हणून नव्हे तर जीवनशैली म्हणून पाहिले पाहिजे,असे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी क्लबतर्फे सायकल बँक ही अभिनव संकल्पना मांडण्यात आली.घरात वापरात नसलेल्या सायकली संकलित करून त्या गरजू विद्यार्थी, कामगार व नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर सायकलर्स क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सायकलवीर व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले. या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छ पंढरपूर – सुंदर पंढरपूर – तंदुरुस्त पंढरपूर हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

पर्यावरण रक्षण, आरोग्य संवर्धन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा वर्धापन दिन सोहळा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Back To Top