प्रेक्षकांमध्ये बसून खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतला शिवबा ते छत्रपती महानृत्य नाट्य कलाविष्काराचा आनंद

प्रेक्षकांमध्ये बसून खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतला शिवबा ते छत्रपती महानृत्य नाट्य कलाविष्काराचा आनंद

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 150 कलाकारांचा भव्य कलाविष्कार; खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ जून २०२६ : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत अस्तित्व मेकर्स सोलापूर यांच्यावतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवबा ते छत्रपती’ या भव्य महानृत्य नाट्य कलाविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाचे प्रभावी सादरीकरण करणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल 150 कलाकारांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे खासदार प्रणिती ताई शिंदे यांची साधी व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारी उपस्थिती ठरली. त्यांनी कोणत्याही विशेष आसनाची अपेक्षा न ठेवता थेट प्रेक्षकांमध्ये खाली बसून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला.त्यांच्या या साधेपणाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी कलाकार आणि आयोजकांचे अभिनंदन करत शिवचरित्रावर आधारित असे सांस्कृतिक कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले. तसेच युवकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आयोजक ॲड.बसवराज सलगर आणि अस्तित्व मेकर्सचे अध्यक्ष किरण लोंढे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे स्वागत केले. कार्यक्रमास बळवंत जोशी, मनोज आदटराव, निशीगंधा कापरे,मनोज यलगुलवार,गणेश डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या या भव्य नृत्य-नाट्य कलाविष्काराला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून कलाकारांच्या सादरीकरणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Back To Top