हिंदू कोड बिलामुळेच महिलांना समान अधिकार; डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला गौरव
महिलांच्या न्याय,वारसा आणि समान हक्कांचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
रामगढ / मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज:महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले हिंदू कोड बिल हे स्वतंत्र भारताच्या सामाजिक न्यायाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे विधेयक असून त्याच माध्यमातून महिलांच्या समान अधिकारांचा पाया रचला गेला, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

झारखंडमधील रामगढ येथील राधा गोविंद विद्यापीठात आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक आणि कामगार विषयक विचार’ या विषयावरील राष्ट्रीय सेमिनारमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला विद्यार्थी,प्राध्यापक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, हिंदू कोड बिलामुळे महिलांना वारसा हक्क, संपत्तीवरील समान अधिकार, घटस्फोटानंतरचे कायदेशीर हक्क तसेच शिक्षण आणि रोजगारातील समान संधी मिळाल्या.भारतीय महिलांच्या सन्मान व न्यायासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आहे.
कामगार कल्याण क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे कामाचे तास १२ वरून ८ केले तसेच गर्भवती महिलांसाठी भरपगारी प्रसूती रजेची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यामुळे भारतीय कामगारांच्या हक्कांना बळकटी मिळाली.

आर्थिक क्षेत्रातील योगदानाबाबत बोलताना आठवले यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा उल्लेख करत डॉ.आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ असल्याचे सांगितले.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या वैचारिक पायामध्ये त्यांच्या संशोधनाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच दामोदर व्हॅली प्रकल्प,जलसंपदा विकास,धरणे आणि नदीजोड संकल्पनेतही त्यांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडते,असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक बैजनाथ शाह, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रंगनाथ पांडे, कुलगुरू प्रा. रश्मी सिंह,प्रा.आर.सी.मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

