पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13:- आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील रस्त्यावरुन पालखी सोहळ्यास पालखी तळाकडे जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार आदीबाबतची कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत,अशा सूचना पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले,तहसिलदार सचिन लंगुटे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेश सुडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उप कार्यकारी अभियंता भिमाशंकर मेटकरी,नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,मंदीर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महावितरणचे श्री.भोळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले,पालखी महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून वाखरी पालखी तळालगत नवीन रस्त्याचे काम सुरु असून या ठिकाणी रस्त्यांची उंची वाढविण्यात आल्याने पालखी तळावर पालखी सोहळ्यास जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार करण्यात यावा, भंडीशेगांव येथील चौरंगीनाथ महाराज पालखी तळाचे सपाटीकरण करण्यात यावे. पालखी मार्गावरील पाण्याच्या स्त्रोताची ठिकाणे निश्चित करावेत.पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या टँकरला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेवून तात्काळ नियोजन करावे. मंदीर समितीने भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करावे.आषाढी यात्रा कालावधीत 65 एकर येथे येणाऱ्या दिड्यांची व भाविकांची संख्या विचारात घेता प्लॉटवाटपसह आवश्यक सोयीसुविधांचे नियोजन करावे.

महावितरणने पाणी स्त्रोताची ठिकाणी अखंडीत वीज पुरवठा उपलब्ध ठेवावा. पालखी तळांवर तसेच शहरातील विद्युत दुरुस्तीचे कामे तात्काळ सुरु करावीत. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदीर समिती व नगरपालिकेने अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.आवश्यक ठिकाणी वाहन तळाचे मुरमीकरण करावे तसेच त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था, प्रसाधनगृह,माहिती आदी सुविधा द्याव्यात. जलसंपदा विभागाने कुंभार घाटाची तात्काळ दुरुस्ती करावी.अन्न व औषध प्रशासनाने पालखी मार्गावरील व शहरातील खाद्यपदार्थाच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके नेमावेत. नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी मोहिम राबवावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध राहिल याचे नियोजन करावे अशा सुचनाही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले म्हणाले,आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेबरोबरच वाहतुक व्यवस्था देखील महत्वाची आहे. यासाठी एसटी महामंडळाने एसटी बसेस त्यांनी निश्चित केलेल्या वाहन तळाच्या ठिकाणीच पार्किंग कराव्यात.वारी कालावधीत पाऊस असल्याने पार्किंगच्या ठिकाणी मुरमीकरण करावे. एस.टी बसेस रस्त्याच्या कडेला लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध सुविधांचे तसेच ठिकाणांची माहितीसाठी कायमस्वरूपी माहिती फलक लावावेत.पत्रा शेडमध्ये कुठल्याही स्टॉलला परवानगी देऊ नये.भीमा नदी पात्रावरील दगडी पुलाच्या साईट रोलिंगचे काम करावे. अहिल्या पुलावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याने त्या ठिकाणी प्रखर प्रकाश व्यवस्था करण्यात यावी. मंदिर समिती व नगरपालिकेने पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी अधिकचे सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचनाही उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी दिल्या.

पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी कामे मोठ्या प्रमाणावर बाकी आहेत.ती कामे वारी पूर्वी पूर्ण करण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.तसेच पार्किंगच्या ठिकाणी आणि पत्रा शेडजवळील काही ठिकाणी पाणी साठत असते त्याठिकाणी केवळ मुरुमीकरण करून काहीही फायदा होणार नाही उलट पाऊस पडल्यानंतर त्याठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होते हा अनुभव आहे तर त्यादृष्टीने विचार केला जाणे गरजेचे आहे.या चिखलामुळे घसरुन पडून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पार्किंगच्या ठिकाणाहून मुक्कामाच्या ठिकाणी येण्यासाठी व्यवस्था करण्यात आली तर त्यादृष्टीने विचार केला पाहिजे.वाहनं असतील तर त्यांचे साधारण भाडे ठरवून दिले तर भाविकांची होणारी लूट थांबेल.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading