कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी, कामगार व समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्य रचना करणारे युगप्रवर्तक – कवी धनंजय सोलंकर

लेखक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत कवी धनंजय सोलंकर यांचे विशेष व्याख्यान संपन्न

कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी,कामगार आणि समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्यरचना करणारे युगप्रवर्तक होते-कवी धनंजय सोलंकर

साहित्य हे भावनांच्या अभिव्यक्तीचे माध्यम- डॉ.रमेश शिंदे

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज: रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या साहित्यिक – सांस्कृतिक कार्यक्रमात कवी धनंजय सोलंकर यांनी कवी कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या साहित्यिक वारसाचा आवर्जून उल्लेख करत मराठी भाषेतील मूल्याधारित साहित्यनिर्मितीचे महत्त्व रेखांकित केले. मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांनी रुसा काम्पोनंट आठ फॅकल्टी एक्स्चेंज उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ.रमेश शिंदे हे होते.

कवी धनंजय सोलंकर यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यातील प्रामाणिकपणा, संवेदनशीलता,समाजप्रेम आणि माणुसकी हे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांसमोर मांडले.त्यांच्या भाषणात ते म्हणाले की,कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी,कामगार आणि समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्यरचना करणारे युगप्रवर्तक होते.त्यांच्या कवितेतून युवकांना संघर्षाची प्रेरणा मिळाली.परस्त्रीला आई-बहीण मानणे हाच खरा पुरुषार्थ आणि ईश्वरी संकेत आहे.सोलंकरांनी स्वतःच्या साहित्यिक प्रवासाबद्दल सांगताना सामान्य माणसाचे जीवन,स्त्रीचे मातृत्व आणि गुरूजनांचे मार्गदर्शन यांना कवितेची प्रेरणा म्हणून उद्धृत केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ.रमेश शिंदे म्हणाले की,साहित्य हे भावनांच्या अभिव्यक्तीचे माध्यम असते.साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते.मराठीचा गौरव म्हणजे तिच्या परंपरा आणि प्रयोगशीलतेचा समन्वय,विद्यार्थ्यांना भाषा आणि भावनांचा अभ्यास करण्याचे आवाहनही केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. दत्ता डांगे यांनी करून दिला.प्रा.सारिका भांगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सुमित साळुंखे,डॉ.बापूसाहेब घोडके, अमोल माने, अभिजीत जाधव,ओंकार नेहतराव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकळस, विविध विभागातील प्राध्यापक,विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार प्रा.हरीभजन कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Back To Top