तणहोळी स्थानिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचे आवाहन…
मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि)
जैविक आक्रमणा-विरोधात हरीत चळवळ अंतर्गत
जागतिक परिसंस्था पुनरुज्जीवन दशकाचे औचित्य साधून हटवा तण वाचवा वन,हटवा तण वाढवा वन,हटवा तण वाढवा कृषीधन,हटवा तण वाचवा गो-धन,तणमुक्त भारत स्वच्छ भारत,तण खाई वन तण खाई धन, हटाओं तण बचाओ वन,स्थानिक देशी वनस्पतींना वाव- उपद्रवी परदेशी वनस्पतींना चले जाव,तणहोळी ही ठिणगी आहे तिचा वणवा व्हायला हवा…

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०३/२०२५ – तणहोळी गेल्या काही वर्षांपासुन पुणे शहरासह महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये, उपशहरांमध्ये,शासकीय- निमशासकीय कार्यालये, वन क्षेत्रे तसेच भारतातील इतर राज्यांमध्ये होत आहे.
आज पुण्यात पर्वती येथे तणहोळी प्रसंगी अमित पुणेकर, हिंदवी पुणेकर,स्वराज पुणेकर,शिवम घोडके,आरुष खोडके, सोहम खडके,अनवी घोलप,महेंद्र पाखरे,आप्पासाहेब पुणेकर, सुप्रिया पुणेकर,डॉ.सचिन अनिल पुणेकर आदी उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते.असे करताना अनेक स्थानिक-देशी वृक्षांचा नाहक बळी दिला जातो.भारतीय सण निसर्गाशी नाते सांगणारे आहेत. निसर्गाशी असलेले ऋणानुबंध जपणारे हे सण आहेत. मात्र काळानुसार हे सण निसर्गापासून दूर जाऊ लागले आणि त्यांचा मूळ उद्देश मागे पडला.सण साजरे करताना पर्यावरणीय परिस्थितीचे भान राखणे देखील गरजेचे आहे. दिवसेंदिवस आपल्या परिसरातील वनराई, हरित क्षेत्र कमी होत आहे आणि याचा थेट परिणाम आता त्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीवर व ओघाने मानवी जीवनावर सातत्याने होत आहे.हे पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी होळी सणाच्या निमित्त स्थानिक-देशी वृक्षांऐवजी उपद्रवी परदेशी वृक्ष व तणांची होळी केली तर ते संयुक्तिक व सध्य परिस्थितीला पूरक होईल.परदेशी उपद्रवी तणे-वृक्ष, वन व जल परिसंस्थांचा समतोल बिघडवतात, स्थानिक वनस्पती नष्ट करतात.पिकांचे उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरतात. तणांद्वारे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होतो. जल- तणांमुळे डासांची अपरिमित वाढ होते, त्यामुळे विविध आजार होतात. त्यावर उपाय म्हणून आपण परदेशी तणे नष्ट करायला हवीत यासाठी या तणहोळीचे आयोजन करणे ही काळाची गरज वाटते. तण-होळी मध्ये रानमारी, टणटणी (घाणेरी), उंदीरमारी (ग्लीरीसीडीया),सुबाभूळ (खरतर कुबाभूळ), ऑस्ट्रेलिअन बाभूळ, एरंड, कॉसमॉस (सोन कुसुम), धनुरा (गाजर गवत किंवा चटक चांदणी), चिमुक काटा, टेकोमा, जलपर्णी या उपद्रवी तणांना जाळण्यात आले.

तणांबरोबरच परदेशी, उपद्रवी मासे, किडे व सूक्ष्मजीवांच्या प्रातिनिधिक प्रकाशचित्रांचे दहन देखील करण्यात आले. तणहोळी साजरी करण्याचे हे १० वे वर्ष आहे. यावर्षी पुण्याबरोबर तणहोळीचे आयोजन भारतातील विविध राज्यातदेखील करण्यात येणार आहे.पर्यावरण,आर्थिक व आरोग्य विषयक उपद्रवी तणांचे धोके लक्षात घेवून या अभिनव, पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे, जनजागृतीचा भाग म्हणून तणहोळीचे शहरात, गावात, प्रभागात, उपशहरात, वन्यजीव संरक्षित क्षेत्रात व इतर संबधित ठिकाणी योग्य त्या नियंत्रणा खाली आयोजन केले जावे, या उपद्रवी परदेशी तणांच्या बाबतीत योग्य ते शासकीय धोरण असावे व त्या बाबतीत लोकसहभागातून जनजागृती करण्याचे आवाहन देखील आयोजकांच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आले आहे.तणहोळीच्या माध्यमातून तण मुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत हा संदेश देखील जनमानसात रूढ होवू शकेल…
निसर्ग ठेवा करू जतन, संवर्धनातून, सहकार्यातून घडवू परिवर्तन…
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.