शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर विधानपरिषदेचे उमेदवार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबई येथील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 26 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयांमधून या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री असणारे आमदार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असलेले स्थानिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर शिक्षकांच्या समस्यांवर सातत्याने आवाज उठवणारे ,महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा सांभाळलेले ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

26 जूनला विधान परिषद निवडणुकीचे मतदान होणार असून एक जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक पार पडत आहे.या निमित्ताने महायुती आणि महाआघाडीत पुन्हा एकदा राजकीय लढाई रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार यावरही शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील बरीच समीकरणे अवलंबून असतील अशी चर्चा सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना 31 मे ते सात जून या काळात उमेदवारी अर्ज भरता येणार आहे . त्यानंतर 10 जूनपर्यंत या अर्जांची छाननी होईल.12 जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *