जिल्हाधिकार्यांकडे ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याची मागणी- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे
जिल्हाधिकार्यांकडे ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याची मागणी- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे Demand for cancellation of contractors’ contracts with District Collector – District President Shivaji Shinde

पंढरपूर / प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील 21 शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे पगार गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच काही शासकीय धान्य गोदामातील ठेके एका-एका संस्थेकडे जास्त असल्याने ठेकेदारांना सर्वांचे पगार वेळेत करणे शक्य नाही. शासकीय धान्य गोदामातल कामगार अतिआवश्यक सेवा म्हणून कोरोना कालावधीमध्ये सुद्धा प्रामाणिकपणे केले आहे. परंतू आज त्यांच्या पगाराबाबत ठेकेदारांकडून उदासिनता दिसत आहे. तरी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याकडे स्वत: लक्ष घालून शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकीत पगार देण्याचे आदेश काढावे असे निवेदन जिल्हा हमाल मापाडी समन्वय समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ठेकेदाराने पंतप्रधान मोफत धान्य व नियमीत रेशन धान्य यांचे पगार जवळ जवळ एका-एका शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे 25 लाखाच्या पुढे ठेकेदाराने दिले नाहीत. याशिवाय काही ठिकाणचे ठेके रद्द झाल्याने त्या ठिकाणच्या कामगारांचे पगार कोण देणार हा सवाल उपस्थित होत आहे.शासकीय धान्य गोदामातील माळशिरस, अकलूज व नातेपुते या ठिकाणचे ठेके श्रीराम मागासवर्गीय हमाल कामगार सहकारी संस्था लि,अक्कलकोट या संस्थेला दिले होते. परंतू त्या ठेकेदाराच्या अकुशल कामगिरीमुळे त्या ठिकाणचे ठेके रद्द झाले आहेत. आज मितीला श्रीराम मागासवर्गीय हमाल कामगार सहकारी संस्थेकडे अकलूज, नातेपुते व माळशिरस येथील शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे प्रत्येकी 12 लाखांपर्यंतचे पगार थकले आहेत. त्यामुळे ठिकाणचे थकीत पगार आपण स्वत: लक्ष घालून, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना माथाडी बोर्डात पगार भरणा करण्यास सांगून व संबंधित ठेकेदाराचे ठेके रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच मोहोळ येथील शासकीय धान्य गोदामातील ठेका मनोहर माथाडी कामगार सहकारी संस्था मर्या. सोलापूर यांच्याकडे असून या संस्थेनेही जून अखेरपर्यंत 29 लाख रूपये पगार देणे बाकी ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामाकडे लक्ष देऊन संबंधित कामगारांचे पगार वेळेत करावेत व जिह्यातील ठेकेदारी पद्धत बंद करून जिल्हा पुरवठा विभागाकडून माथाडी बोर्डाकडे भरणा करून पगार करावेत अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे संघाच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणी मान्य न झाल्यास कामगारांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिला आहे.
यावेळी आबाजी शिंदे, भिमा सिताफळे, सिद्धू हिप्परगी, गोरख जगताप,अॅड.राहूल सावंत, शिवानंद पुजारी, गुरू पुराणिक, दत्ता मुरूमकर, बप्पा चव्हाण आदीसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.