मोठेपणातील साधेपण की साधेपणातील मोठेपण ???

मोठेपणातील साधेपण की,साधेपणातील मोठेपण ???
(दि ग्रेट भेट विथ प्रल्हाद दामोदरदास मोदी Pralhad Modi )

सर्वसाधारणपणे ज्या व्यक्ती सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असतात, त्यांच्या कुटुंबाभोवती एक प्रतिष्ठा,सत्ता,मस्ती याचे वलय निर्माण होते. त्यामुळे साधे नगरसेवक असलेल्या कुटूंबातील सदस्यही त्याच तोऱ्यात वागायला बघतात. साहेबांचा ड्रायव्हर, कुकही ही प्रसंगी अधिकाऱ्यांना दम भरतो.

मात्र कालच्या एका प्रसंगामुळे मोठेपणातील साधेपण काय असतो, हे प्रत्यक्ष याची डोळा अनुभवले आणि मन प्रभावित झाले.

  एका घरगुती कार्यक्रमासाठी आम्ही इंदापूर हायवेवर असलेल्या देशपांडे हॉटेलवर जेवणासाठी गेलो होतो. जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना एक प्रवासी इनोव्हा गाडी हॉटेल प्रांगणात येऊन उभी राहिली. आमच्या शेजारच्या टेबलवर एक गौरवर्ण, सफेद पोशाख,गळ्यात भगवे वस्त्र, वयोमानानुसार शुभ्र झालेले केस आणि दाढी त्यांच्या समवेत कुटुंबातील काही नातेवाईक व सदस्य असे एक कुटुंब टेबलवर विराजमान झाले. दुपार 2.00 ची वेळ असल्याने ते जेवायला शुद्ध शाकाहारी हॉटेल शोधत थांबले होते. त्या गौरवर्ण असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीने शांतपणे बॅगमधील इन्शुलिन पेटी काढली. त्याची विशिष्ट मात्रा स्वतःच्या हाताने घेतली, आपल्या अंगरख्याचे टोक दाताने वर धरून पोटावर स्वतः टोचून घेतले आणि अत्यंत साधेपणाने जेवण मागविले. हा सर्व प्रकार त्यांच्या शेजारी बसलेले आम्ही पाहत होतो.पाहता क्षणी ही कोणीतरी मोठी व्यक्ती असावी असे मनाला वाटू लागले. तोच आणखी एक गाडी आली आणि त्यातून काही सहकारी उपस्थित झाले. 

त्यांच्याकडे चौकशी केली असता समजले की हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी आहेत.हे कळताच हॉटेल चालकाने धावपळ सुरू केली. त्यांनी तात्काळ सत्काराचे नियोजन केले. जेवण झाल्यानंतर त्यांनी अत्यंत आदरपूर्वक सत्कार स्वीकारला. एवढेच नव्हे तर उपस्थित असलेल्या हॉटेलच्या वेटर पासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांबरोबर फोटोसाठी उभे राहिले. मी जेव्हा एका शाळेत शिक्षक आहे असा माझा परिचय करून दिला. त्यावेळी ते हसत म्हणाले, कोई बात नही मै तेरा स्टुडन्ट हूं । असे म्हणत हसत हसत त्यांनी फोटोसाठी पोझ दिली. मी जेव्हा त्यांना पदस्पर्श केला तेव्हा, त्यांच्या अत्यंत साध्या असणाऱ्या पायातील कापडी बुटमधून मला दिव्य पददर्शन झाले. चौकशीअंती असे कळाले की पूर्वी ते एक रेशन दुकान चालवत असत.आता ते आपल्या कामातून निवृत्त झालेले आहेत. मात्र पूर्वीचेच सामाजिक कार्य करीत आहे.आता ते अखिल भारतीय रेशन दुकान व्यवस्थेवर एका मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.

  सुमारे एक तास हॉटेलमध्ये सर्वसामान्यांमध्ये वावरून, सर्वांचा हसत हसत निरोप घेऊन कोणत्याही प्रकारची सोबत सुरक्षा न घेता, एकही पोलिस बरोबर नसताना, आपल्या आगमनाची पूर्वसूचना न देता, एकही गाडी आपल्या मागेपुढे  न ठेवता, सर्वसामान्य पॅसेंजर प्रमाणे ते मार्गस्थ  झाले. त्यांच्या जाणाऱ्या गाडीचे एका सुक्ष्म बिंदूत रूपांतर होईपर्यंत मी पाहत राहिलो.ते आले,त्यांना आम्ही पहिलं आणि मात्र त्यांच्या वागण्याचा मनावर ठसा उमटून गेले.
यावेळी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या ओळीचा खरा भावार्थ कळाला,
मी पण ज्याचे पक्व फळा परी सहजची गळले हो, जीवन त्यांना कळले हो।

खरंच एक पंतप्रधानाचा सखा भाऊ एका ईनोवा गाडीमध्ये कुटुंबियासह हायवेवर हॉटेलमध्ये जेवायला थांबतो, कोणतीही सुरक्षा व्यवस्था घेत नाही, सर्वसामान्य लोकात रमतो आणि शांतपणे मार्गस्थ होतो हे सतत सत्तेच्या नशेत वावरणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांना कधी कळू शकेल काय म्हणून हा लेखप्रपंच…

श्री.व्ही.एम.कुलकर्णी
पंढरपूर ,जि.सोलापूर

प्रतिनिधी – नागेश आदापूरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: