जिल्ह्यात ऊसतोड व घर कामगारांची नोंदणी विशेष कँपद्वारे मोहिम स्तरावर करा -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

अहिल्यानगर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५-ऊसतोड कामगार व घर कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जिल्ह्यात ऊसतोड कामगार व घर कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष कँपचे आयोजन करत मोहिम स्तरावर ही नोंदणी करण्याचे निर्देश महाराष्ट विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यां समवेत आयोजित आढावा बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,पोलीस उपअधीक्षक अमोल भारती,निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे,समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शैक्षणिक सुविधा,सामाजिक सुरक्षा योजना यासारख्या योजनांचा लाभ देण्यासाठी नोंदणी शिघ्रगतीने करण्यात यावी.कामगारांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आरोग्य शिबीरांचेही कँप आयोजित करण्यात यावेत.कामगारांचा आरोग्य विमा,अपघात संरक्षण विमा काढण्यासाठीही पुढाकार घेण्यात यावा. याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर असलेल्या निधीतून ३ टक्के निधी महिला व बालकल्याण विभागासाठी राखीव ठेवण्यात येतो.या निधीचा उपयोग महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनांसाठी करण्यात यावा.पिडीत महिलांना मनोधैर्य योजनेतून मदत केल्या जाते.परंतु अत्याचाराची घटना घडल्यास महिलांना तातडीची मदत या निधीतून करण्याची सुचनाही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या.
बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास अधिक गंभीरपणे व संवेदनशिलतेने होण्यासाठी जिल्ह्यात बालस्नेही पोलीस ठाण्यांची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी हे बालस्नेही पोलीस ठाणे उभारणीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.जिल्ह्यातील भरोसा सेलचे सक्षमीकरण करण्यात यावे.ज्या ठिकाणी भरोसा सेल उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ऑनलाईन भरोसा सेल तातडीने कार्यान्वित करण्यात यावेत.भरोसा सेलमध्ये कार्यरत महिला पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यां मार्फत केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे तर मानवीदृष्टीकोनातून सेवा देता यावी यासाठी या अधिकारी,कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.गृहभेटीतून पिडीत महिलांचे समुपदेशन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
अँटी रॅगिंग सेलबाबतची माहिती विद्यार्थी,विद्यार्थीनींना व्हावी यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक,प्राचार्यांशी बैठक घेऊन शाळा व महाविद्यालयातून संवाद कार्यक्रम घेण्यात यावेत. अंमली पदार्थ विरोधी जागृतीचा कार्यक्रम राबविण्यात यावा.सखी सावित्री समितीसाठी एक कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी.याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांनाही होईल.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनींना विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते.आवश्यकतेनूसार समाधान शिबीराचे आयोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात अनेक धार्मिक व इतर पर्यटन केंद्रे असून त्याठिकाणी सातत्याने पर्यटक भेट देत असतात. या पर्यटकांना समस्यांची तक्रार करण्यासाठी मदत सेवा केंद्र सुरु करण्यात यावे.यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र वेळ राखीव ठेवण्यात येऊन महिलांच्या तक्रारींचे निरसन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील विविध कामांची माहिती दिली.

