श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शन रांगेतील घुसखोरीबाबत कंत्राटी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल
श्री तारे यांचेवर गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून संबंधित कर्मचा-याची सेवा समाप्त करण्यात आली
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०७/२०२५ – आषाढी यात्रा 2025 सुरू असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.या दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार क्र.जबाबी/कावि/17/2025 दि.13/06/2025 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश पारीत केला आहे.
तथापि दि.08 जुलै रोजी सकाळी 5.30 वाजता त्या सुमारास बीव्हीजी कंपनीचे सुरक्षा रक्षक काशिनाथ तारे यांनी श्रींच्या पदस्पर्श दर्शन रांगेत कासारघाट येथील आपत्कालिन मार्गातून दोन नातेवाईकांना दर्शनासाठी प्रवेश देऊन आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे.
या कर्मचा-याची आषाढी यात्रा 2025 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात दर्शन रांग द्रुतगतीने चालविण्यासाठी बीव्हीजी कंपनीने नियुक्ती केली होती.या कर्मचा-यावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी सुरक्षा विभाग प्रमुख राजाराम ढगे यांना प्राधिकृत करण्यात आले असून श्री तारे यांचेवर गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. याशिवाय संबंधित कर्मचा-याची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
आषाढी यात्रेत झालेली गर्दी विचारात घेऊन, दर्शनरांग द्रुतगतीने चालून भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत अशा पध्दतीने घुसखोरी करणा-यावर मंदिर समितीने कठोर स्वरूपाची कारवाई करण्याची दक्षता घेतली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

