नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन


रिपब्लिकन पक्षाचा जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 – नक्षल वाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडुन आमच्या सोबत आले पाहिजे.त्यांच्या त्यागाचा आम्ही आदर करतो.न्यायासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला पाहिजे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार वाटचाल करावी.नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे.जनतेत जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवावी. नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

महाराष्ट्र सरकारने मंजुर केलेल्या जनसुरक्षा कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहिर करताना आज मुंबईत ना.रामदास आठवलेंनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्विकारण्याचे आवाहन केले.

जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या हिताचा आहे.संविधानाने विधानसभा, विधी मंडळाला कायदा करण्याचा अधिकार दिला आहे.त्यानुसार जनसुरक्षा कायदा विधि मंडळात संमत झालेला आहे.विद्रोही लेखन जरुर करावे.नक्षलवाद्यांच्या हिंसक मार्गाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देणारे लेखन करु नये.शहरी नक्षलवाद रोखला पाहिजे.हिंसक मार्गामुळे हजारो नक्षलवादी मारले गेले आहेत.मागुन वार करण्याची पध्दत योग्य नाही.समोर येवून वैचारिक वार केला पाहिजे. आम्ही सुध्दा दलित पँथरच्या चळवळीत संघर्ष केला आहे.आमच्या दलित पँथरला कोणीही नक्षलवादी म्हटले नाही.जनसुरक्षा कायद्यामुळे कोणाही निरपराधाला जाणिवपुर्वक नक्षलवादी ठरवू नये.जनसुरक्षा कायद्यामुळे असे चुकीचे प्रकार घडुन अन्याय होवू लागला तर या कायद्यात बदल करण्याचा अधिकार विधीमंडळाला आहे. सरकारने सर्व बाजुंचा विचार करुनच जनसुरक्षा कायदा केला आहे असे सांगत ना.रामदास आठवले यांनी जनसुरक्षा कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहिर केले.

