निरपेक्षपणे व निर्भीडपणे समाज पुरुषांची स्पंदने मांडणारे वृत्तपत्र लेखक – डाॅ. सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर
कोल्हापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वृत्तपत्रे आणि वृत्तपत्र संपादक यांचे योगदान निश्चितच मौलिक आहे.तथापि प्रसारमाध्यमांच्या या उज्वल वाटचालीत वाचकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर आजही वृत्तपत्रांमध्ये आपले मौलिक अस्तित्व टिकवून आहे. वाचकांच्या पत्रव्यवहाराचे सामाजिक महत्व ओळखून समस्त संपादकांनी या पत्रव्यवहारास संपादकीय पानावर खास जागा दिली आहे. वृत्तपत्रांचे वाचक आपली मते, विचार, तक्रारी, अपेक्षा, वादविवादावरील प्रतिक्रिया या सदरातून व्यक्त करीत असतात.वाचकांच्या पत्रातून समाजपुरुषाची स्पंदने, समाजाच्या जाणीवा व्यक्त होत असतात.
वृत्तपत्रांना समाजाचा आरसा म्हटले आहे अर्थात म्हणूनच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या पहिल्या वृत्तपत्राचे नांव दर्पण असे ठेवले होते,समाजमनाच्या जिवंतपणाचा प्रत्यय वृत्तपत्रांच्या ‘वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून येतो आणि जनसामान्यांची महाशक्ती म्हणून या वाचकांच्या पत्रांकडे पाहिले जाते.

स्वातंत्र्यात्योर काळात देशाचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या प्रक्रियेत वृत्तपत्रांनी आपले मोठे योगदान दिले आहे. देश विकासासाठी वृत्तपत्रांचा वाचक नेहमीच कटीबद्ध असल्याचा प्रत्यय आला आहे. वाचकांच्या पत्रातून अनेक चांगल्या उपयुक्त सूचना तसेच काही चुकीचे विघातक घडत असेल तर त्यावर परखडपणे प्रहार केले असल्याचे आजवरच्या वाटचालीत दिसून आले आहे.अनेक वृत्तपत्रांनी पत्रलेखन करणाऱ्या वृत्तपत्रलेखकांचे संमेलन भरवून वाचकांच्या विचारांना चालना देण्यासाठी प्रयत्न केला आहे.त्यातूनच ठिकठिकाणी वृत्तपत्र लेखक संघाची निर्मिती झाली आहे. अशा गावोगावच्या वृत्तपत्र लेखक संघाला नेहमीच सृजनशील कार्यकर्ते लाभत गेले आहेत.
विशेष उल्लेख करायला हवा तो म्हणजे मुंबई येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा. या संघाने गेल्या ७७ वर्षात वृत्तपत्र लेखकांचे संघटन करून त्यांना सन्मान देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. प्रती वर्षी वृत्तपत्र लेखकांचे संमेलन भरवून ती सर्व संमेलने यशस्वी केली आहेत.

१९७६-७७-७८ च्या संमेलनाला दैनिक नवशक्तीचे संपादक पु.रा बेहेरे उपस्थित होते. या संमेलनात त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त भालचंद्र देशमुख याना संघाच्या कार्यालयासाठी जागा देण्याची सूचना केली. या सूचनेचा स्वीकार करीत देशमुख यांनी संघाला दादर-पूर्वेकडील शिंदेवाडी महापालिका शाळेत एक वर्गखोली उपलब्ध करून दिली. बेहेरे एव्हढ्यावरच थांबले नाहीत तर संस्था वाढीसाठी पोषक वातावरण करून देण्यासाठी नवशक्तीची संपादकीय केबिन वृत्तपत्र लेखकांसाठी उघडी करून दिली. त्यामुळे त्यानंतरच्या काळात झपाट्याने या संस्थेची वाढ झाली. राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, सर्वोत्कृष्ट पत्र स्पर्धा, सामान्य जनतेच्या प्रश्नावर वार्तालाप, वृत्तपत्र लेखक कार्यशाळा इत्यादी अनेक चांगले उपक्रम सुरु झाले आणि महाराष्ट्रभर संस्थेचे कार्य विस्तारले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील ही वृत्तपत्र लेखक संघ ही नावलौकिक मिळवून आहे.
वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर लेखन क्षेत्रातील करियर करण्याची महत्वपूर्ण शिडी आहे. वाचकांच्या पत्रातून लिहिणाऱ्या पत्रलेखकांचे राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक भान चांगले असल्यामुळे त्यांना प्रसार माध्यमात चांगल्या नोकऱ्या मिळणे शक्य झाले आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीतील अनेक दिग्गज संपादक, पत्रकार व लेखक यांचा वृतपत्रीय श्रीगणेशा वाचकांचा पत्रव्यवहार” या सदरातूनच झाला आहे, हे अनेकांनी खुल्या दिलाने मान्य केले आहे. अर्थात अस्मादिक सुध्दा या गोष्टीला अपवाद नाहीत.
विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागात शिकलेला विद्यार्थी माध्यमे किंवा इतर क्षेत्रात काम करण्यासाठी पहिली पायरी चढतो ती वाचकांचा पत्रव्यवहार या सदराची. त्यामुळे तो कधीही अयशस्वी ठरलेला नाही. हे मान्य करावे लागेल.केवळ समाज प्रबोधनाचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन कोणतेही आर्थिक व संस्थात्मक पाठबळ नसताना वृत्तपत्र लेखक निरपेक्षपणे व निर्भीडपणे समाज पुरुषांची स्पंदने मांडत असतो, लोकशाही समाजव्यवस्थेत यांचे महत्त्व अधोरेखित होते आहे .
कवी अनिल यांनी आपल्या कवितेतून ‘पेरते व्हा’ असा जो संदेश दिला आहे. तो तंतोतंत पालन करण्याचे महत्कार्य मराठी वृत्तपत्र सृष्टीतील वृत्तपत्र लेखक निरपेक्षपणे करीत आहेत.

-डाॅ.सुनीलकुमार सरनाईक. भ्रमणध्वनी : ९४२०३५१३५२
लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत
पत्ता: पैस, रिसनं ७४६/१, वसंतराव सरनाईक पार्क, देवकर पाणंद, छत्रपती शिवाजीनगर, कोल्हापूर -४१६००७